कोविड 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेअंतर्गत पुरेसा लससाठी उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी लसीकरण बंद राहणार आहे.
मुंबईत पुरेशा लसीअभावी पुन्हा एकदा लसीकरण मोहिम रखडली आहे. सलग दोन दिवस लसी न मिळाल्याने मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय लोकल प्रवास करता येणार नाही. त्यामुळे लसीसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. अशातच लसीकरण 2 दिवस बंद असल्याने मुंबईकरांचे दोन दिवस वाया जाणार आहेत.
दरम्यान, 12 ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत लससाठा प्राप्त होणार असून त्याचे वितरण शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट 2021 रोजी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांना करण्यात येईल. त्यामुळे शनिवार, दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण पुन्हा सुरु होईल.
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.