Palghar Nargrik

Breaking news

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता; पालिकेची नवीन नियमावली जारी……

कोविड – 19 संसर्ग परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आता नागरिकांसाठी खुले राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यासह आवश्यक सर्व निर्देशांचे पालन करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

मुंबई महानगरातील कोविड19 संसर्ग स्थिती सध्या नियंत्रणात आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटे दरम्यान महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांसह मुंबईकर नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे संसर्ग स्थितीवर नियंत्रण आणणे शक्य झाले. कोविडवर नियंत्रण आणल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मिशन ब्रेक दी चेन मध्ये टप्प्याटप्प्याने उपाययोजना करून जनजीवन पूर्ववत खुले केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरातील 860 उद्याने, 318 मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत खुली राहतील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि उद्याने अधीक्षक जितेंद्र परदेशी ह्यांनी दिली आहे.

सार्वजनिक ठिकाणांवर वावरताना गर्दी न करता सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे. त्यासोबत प्रत्येकाने मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. जंतुनाशक द्रव्य (sanitizer) किंवा साबण आणि पाण्याने हातांची नियमित स्वच्छता राखणे देखील आरोग्यासाठी हिताचे आहे. त्यामुळे नागरिकांनी या सर्व बाबींचे योग्य पालन करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

Leave a Comment