टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीतील टोलनाका फोडला आहे. हा टोलनाका फोडतानाचा (Bhiwandi Toll Naka) व्हीडिओ मनसे अधिकृत या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. तोडफोड करण्यात आलेला हा टोलनाका भिवंडीतील मोलाडी परिसरातील आहे. या व्हीडिओमध्ये टोलनाक्याची तोडफोड करत असलेल्यांच्या हातात मनसेचा झेंडा दिसून येतोय. या कार्यकर्त्यांनी काठ्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. (Maharashtra Navnirman Sena activists vandalized a toll plaza in Malodi area of Bhiwandi)
इशाऱ्यानंतरही वसुली सुरुच…
मनसेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी या टोल नाक्यावरील टोलवसुली बंद करावी, असा इशारा गुरुवारी दिला होता. या इशाऱ्यानंतर काही वेळ टोलवसुली बंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर संध्याकाळी पुन्हा वसुली सुरु करण्यात आली. त्यामुळे मनसैनिकांनी या टोलनाक्याची तोडफोड केली. तोडफोडीमुळे या टोलनाक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे आता मनसे पुन्हा एकदा टोलनाक्यांचा मुद्दा पुन्हा हातात घेणार का, याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.