पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सरळ सेवा शिक्षक भरती प्रक्रिया करण्याबाबत दखल न घेतल्याने आदिवासी डी.टी.एड,बी.एड(TET/CTET पात्र) कृती समिती पालघर, या संघटनेने २३ ऑगस्ट रोजी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. यानिमित्त जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे यांनी आज उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. समितीच्या मागण्या जाणून घेतल्या आणि या संबंधी समितीची बाजू लावून धरून आम्ही शासनाकड़े तूमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करू असे आश्वासन सभापती सांबरे यांनी उपोषण कर्त्यांना दिले.यावेळी पंचायत समिती सभापती मोखाडा सारिका निकम, माजी जि.प.अध्यक्ष भारती कामडी, जि.प.सदस्य प्रकाश निकम, जयेंद्र दुबळा उपस्थित होते.
तसेच आज शिक्षण समिती सभेमधे ही संघटनेच्या सदस्यांनी सभापती सांबरे यांना भेटून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी निवेदन दिले.
यात जिल्हा परिषद, पालघर पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मधून न करता आदिवासी विकास विभाग (१ डिसेंम्बर २०१९ शासन निर्णय) यांनी केलेल्या शिक्षक भरतीच्या धर्तीवर जिल्हा निवड कमिटी द्वारे करण्यात येऊन रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात , 2014 ते 2021 पर्यंत रिक्त असलेला अनुसूचित जमाती बिंदूनामावली बॅकलॉग पूर्ण भरण्यात यावा व इतर मागण्यांचा समावेश आहे.