राज्यात मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी भाजपला सुनावलं आहे. कोविडचा काळ अजूनही सरलेला नाहीए. या काळात आपण राजकारण न करता जबाबदारीने वागलं पाहिजे, सध्या आरोग्यकेंद्रांची गरज आहे, मंदिरंही उघडणार पण टप्प्याटप्पयाने असं सांगत मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू, अशा कानपिचक्या दिल्या आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शिवसेना आणि भाजपा नेते एकाच व्यासपीठावर होते. केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil), शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde), आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राज्यातील आरोग्य मंदिरं सुरु आहेत
‘आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. आजच्या परिस्थितीत आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत. आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम द्यायला चांगल्या आहेत. आम्हीही त्या घोषणा दिलेल्या आहेत. घोषणेच्या पुढे जात आम्ही हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे. हे 92-93 साली दाखवून दिलेलं आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा फेरीवाल्यांना इशारा
ठाण्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात त्यांच्या हाताची दोन बोटं तुटली. याचा उल्लेख करताना आपल्याला काही ठिकाणी कठोर कायदा राबवावा लागेल असं म्हटलं आहे. तिकडे दया क्षमा दाखवता येणार नाही, आपल्या नागरिकांची आणि आपल्या माता भगिनींची जबाबदारी आपली आहे, त्यात कुठेही हयगय चालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. केवळ स्कायवॉकच नाही तर जिथे फेरीवाल्यांचा उच्छाद असेल तिथे तो आटोक्यात आणावाच लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.