मुंबईत डेल्टा व्हेरीयंट निष्प्रभ झाल्याचे तपासणीतून समोर आलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 564 नमुन्यापैंकी एकही डेल्टा प्लसचा नसल्यावर प्रयोगशाळेनं शिक्कामोर्तब केलंय. अहवालानुसार 374 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, यापैकी 304 नमुने हे ‘डेल्टा’ (Delta) उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर नमुन्यांमध्ये ‘नाईन्टीन-ए’ (19A) उप प्रकारातील 2 आणि ‘ट्वेन्टी-ए’ (20A) उप प्रकारातील 4 नमुने आणि उर्वरित 66 नमुने हे सर्वसाधारण कोविड विषाणूचे आहेत. विशेष म्हणजे पहिल्या व दुस-या अशा दोन्ही टप्प्यातील नमुन्यांमध्ये अतिवेगाने लागण होणाऱ्या ‘डेल्टा प्लस’ या उपप्रकारातील एकही नमुना आढळून आलेला नाही, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
दरम्यान, ‘डेल्टा’ या उप प्रकारातील कोविड विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, कोविड – 19 विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, 2 किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे विनम्र आवाहन काकाणी यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मनपा प्रशासनाच्या वतीने केले आहे.
पहिल्या चाचणीतील आकडेवारीचे विश्लेषण
या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये पहिल्या टप्प्यातील (फर्स्ट बॅच) चाचण्यांचे निष्कर्ष गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या एकूण 188 रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये 128 रुग्ण हे ‘डेल्टा’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.
या पहिल्या टप्प्यातील आकडेवारी बाबत विश्लेषणात्मक निष्कर्ष नुकतेच हाती आले असून या नुसार डेल्टा बाधीत 128 नमुन्यांपैकी 93 नमुने हे मुंबईतील रुग्णांचे होते. या 93 रुग्णांपैकी 45 नमुने हे पुरुष रुग्णांचे, तर 48 नमुने हे स्त्री रुग्णांचे होते. तसेच या 93 व्यक्तींपैकी 54 व्यक्तींना म्हणजेच सुमारे 58 टक्के व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. तर उर्वरित 42 टक्के म्हणजेच 40 व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. तसेच या 93 रुग्णांपैकी 47 रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली होती. ज्यापैकी 20 व्यक्तींनी पहिला डोस, तर 27 व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले होते. उर्वरित 46 रुग्णांनी लस घेतली नव्हती. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या केवळ 4 रुग्णांना ऑक्सीजन पुरवठ्याची गरज भासली.
मुंबईतील सदर 93 रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील 1 हजार 194 व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. ज्यापैकी केवळ 80 व्यक्तींना कोविड बाधा झाल्याचे आढळून आले. तर 1 हजार 114 व्यक्तींना कोविड बाधा झालेली नसल्याचे आढळून आले.