वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे आणि पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅसचे दर वाढवले आहेत. गॅस कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 43.5 रुपयांनी वाढ केली आहे. (Commercial gas cylinder price hiked by Rs 43) म्हणजेच, आता तुम्हाला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाबा आदी ठिकाणी खाणे महाग पडणार आहे.
इंडियन ऑईल वेबसाइटने नवीन दर
इंडियन ऑईलने जारी केलेल्या नवीन दरांनुसार आता दिल्लीत 19 किलोचे व्यावसायिक सिलिंडर 1736.5 रुपये झाले आहे. यापूर्वी हे सिलिंडर 1693 रुपयांना उपलब्ध होते. मात्र, घरगुती वापरासाठी 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याच वेळी, आता कोलकातामध्ये 19 किलो व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1805.5 रुपये झाली आहे, जी आधी 1770.5 रुपये होती. पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात.
घरगुती सिलिंडरसाठी दिलासा
यापूर्वी 1 सप्टेंबरला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत वाढवून 884.50 रुपये करण्यात आली. या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
सीएनजीच्या किमतीतही वाढ
यापूर्वी सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमतीत 62 टक्के वाढ केली आहे. नैसर्गिक वायूचा वापर खते, वीजनिर्मिती आणि सीएनजी गॅस तयार करण्यासाठी केला जातो. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.