Palghar Nargrik

Breaking news

सीबीआय, आयटीचा सत्ताधाऱ्यांकडून गैरवापर, शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका….

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करत असल्याची टीका केली. सीबीआय, आयटी, ईडी, एनसीबी या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीने केला जात असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारकडू संस्थांचा गैरवापर

याबाबत बोलताना शरद पवार यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं उदाहरण दिलं. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी तेव्हा काही आरोप केले, त्यातून अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. पण आता ज्यांनी आरोप केले ते आता कुठे आहेत पत्ता नाही. देशमुख यांनी आरोप झाल्यावर तातडीने राजीनामा देण्याची भूमिका घेतली. पण आरोप करणारे गृहस्थ गायब झाले हा फरक आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांच्या घरावर पाच वेळा छापे झाले, मला या एजन्सीचं कौतुक वाटतं की वारंवार जाऊन त्यांना काय मिळतं कळत नाही, पाच वेळा एका व्यक्तीच्या घरी जाणं कितपत योग्य याचा विचार लोकांनी करावा, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. अनिल देशमुख कोर्टात गेले आहेत, येत्या दोन ते तीन दिवसात कोर्टात त्याबाबत सुनावणी आहे. कोर्टात जो काही निकाल येईल त्यानंतर देशमुख चौकशीला सामोरं जातील अशी माहिती शरद पवार यांनी दिली.


चौकशी झाल्यावर बोलेन

अजित पवार यांचं विधान मी वाचलं, ते असं होतं की मी राज्याचा अर्थमंत्री आहे. सरकारचे रिसोर्सेस महत्त्वाचे असतात. त्याची रिकव्हरी करण्यासाठी काही भूमिका घेतली तर मी त्याला विरोध करणार नाही ही माझीही अर्थमंत्री म्हणून जबाबदारी आहे. कर दिले नाहीत त्यासाठी काही भूमिका घेतली तर ठिक, पण यात काही वस्तुस्थिती आहे ते मी कारवाई झाल्यावर बोलेन असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पाहुणाचार अजीर्ण होऊ नये

आयकर विभागाने टाकलेल्या छाप्याबाबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, असे पाहुणे अनेक ठिकाणी येतात पण दोन तीन दिवसांसाठी. पण आता आता सहा दिवस झाले पाहुणचार सुरु आहे. अजीर्ण होऊ नये इतका पाहुणचार घेऊ नये असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. माझ्या तीन मुलींचा तुम्ही उल्लेख केला त्यांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही. आमच्या मुलींनीच विचारलं की तुमचे घरचे वाट बघत असतील. तेव्हा ते म्हणाले की आम्हाला निर्देश आहेत की आम्ही सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही. घरात सहा दिवस तपासणी केली.  कोल्हापूरात 18 लोक गेले, आता पर्यंत असं कधी पाहिलं नव्हतं, ते घडत आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तीन पक्षांना केलंय टार्गेट

सत्तेचा गैरवापर राष्ट्रवादीपुरता नाही, टार्गेट करताना त्याच्या जवळच्या घटकांना टार्गेट केलं जात आहे. उदाहरण अशोक चव्हाण, अजित पवार, सुभाष देसाई त्यांच्या चिरंजीवांच्या जवळचे लोक आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी दोन वर्ष प्रयत्न केले त्यातून काही होत नाही, त्यामुळे आता या मार्गाने भीती दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अशा गोष्टी फार पाहिल्या आहेत आयुष्यात त्याने फरक पडत नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment