Palghar Nargrik

Breaking news

Mumbai Local Train: मुंबई लोकलचं तिकीट केव्हापासून?; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय…..

मुंबई: दिवाळीआधी मुंबईकरांना खूप मोठी बातमी मिळाली आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झाले आहेत अशा प्रवाशांना आता मुंबई उपनगरीय लोकलचं तिकिटही उपलब्ध होणार आहे. याबाबत शनिवारी राज्य सरकारने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला पत्र लिहिले असून आज याबाबत रेल्वेकडून निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, तिकीट खिडकीवर तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. ( Mumbai Local Train Latest Update )

लसचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या सर्व प्रवाशांना लोकलची दारे उघडण्यात आलेली आहेत. युनिव्हर्सल पास असणाऱ्या प्रवाशांना मासिक, त्रैमासिक, सहामाही पास सध्या उपलब्ध करण्यात आला होता. मात्र, दैनंदिन तिकीट सुविधा मात्र सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झालेल्या अनेक नागरिकांना लोकल प्रवास करता येत नव्हता. त्यातून तिकिटीशिवाय प्रवास करणारे प्रवासी वाढल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वेचा महसूलही बुडत आहे. ही सगळी बाब लक्षात घेता एक मोठा निर्णय रेल्वेकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला शनिवारी एक पत्र लिहिलं असून ज्यांचं संपूर्ण लसीकरण झालं आहे व दुसरी लस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत अशा सर्व प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या तिकीटसेवा खुल्या करण्यात याव्यात. त्यात तिकीट खिडकीवर पूर्वीप्रमाणे तिकीटही उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. लोकल तसेच पॅसेंजर ट्रेनने प्रवास करण्यासाठी सर्व प्रकारची तिकीट सेवा खुली करताना जी नियमावली आखून देण्यात आली आहे त्याचेही पालन केले जावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही मुभा देताना ज्याचं संपूर्ण लसीकरण झालेलं नाही, अशा व्यक्तीला लोकल प्रवासास मनाई राहील व याची खबरदारी रेल्वेने घ्यायची आहे. त्यासाठी रेल्वेने आपली संबंधित यंत्रणा राबवावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

राज्य सरकारने रेल्वेला लिहिलेल्या पत्रावर रेल्वेकडून कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत आजच निर्णय होईल, अशी शक्यता असून तसे झाल्यास येत्या एकदोन दिवसांत मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर पूर्वीप्रमाणे तिकीटसेवा सुरू होणार आहे. मुंबईकारांसाठी हा खूप मोठा दिलासा ठरणार आहे.

Leave a Comment