डहाणू. ( सलीम कुरेसी ) – पालघर जिल्ह्यातील पेसा कायद्याअंतर्गत बी.एड / डी.एड शिक्षकांची भरती लवकरच होणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी दिली आहे.
यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, गेल्या 12 दिवसांपासून आदिवासी शिक्षक पात्र उमेदवार पालघर जिल्हा परिषद कार्यालय परिसरात उपोषणाला बसले असून जोपर्यंत शासन लेखी व ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी ठाम भूमिका उमेदवारांनी घेतली आहे. दिवाळीतही हे आंदोलन काळी फिती बांधून सुरू होते. दि. 26 ऑक्टोबरपासून हे आंदोलन शेकडो उमेदवारांनी सुरू केले आहे. या आंदोलनामधील 23 उपोषणकत्यांची प्रकृती खालावली असून 02 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आले आहे. ही बाब अतिशय खेदजनक आहे. त्या अनुषंगाने या प्रश्नाचा तोडगा निघावा म्हणून आम्ही पालघर जिल्ह्यातील पेसा कायदा अंतर्गत डी.एड / बी. एड शिक्षक भरती साठी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आमदार कॉ. विनोद निकोले यांनी महाराष्ट्र राज्य मंत्रालय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत भेट घडवून आणली. दरम्यान लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिले. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांच्यासह शिक्षक उमेदवार शिष्टमंडळात दामूभाऊ मौळे, विवेक कुरकुटे, किरण गोंड, सुभाष राथड, अजय वारंगडे आदींसह माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत गोरखना, डॉ. आदित्य अहिरे उपस्थित होते.