सोलापूर:- दि.२६- मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १५ लाखाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई, नाशिकच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत नीलप्पा शातप्पा नारायणे ( वय ५५,रा. पद्मजा प्लाझा, विजापूर रस्ता ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय हरकचंद टाटिया ( रा.पाटील पार्क नाशिक) व किरण दत्तात्रय सावंत ( रा. अशोक नगर कांदिवली मुंबई) यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२०१४ मध्ये फिर्यादीच्या ओळखीचे स्वप्निल बाहेती यांच्यामुळे आरोपींची ओळख झाली होती. त्यावेळी आरोपीनीं राजकीय नेते व पोलिस अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे पटवून सांगितले होते. त्यानंतर आरोपीनीं सुशील बाफना ( रा.नाशिक) यांच्यासमोर फिर्यादी चा मुलगा अविनाश याला नोकरी लावण्याचे बोलणे केले. त्यासाठी १५ लाख रुपये विजय टाटिया याने सावंत यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळे कारणे सांगून फिर्यादीस विश्वासात घेऊन १५ लाख रुपये देण्यास भाग पाडले. परंतु नोकरीचे काम करत नसल्याचे जाणवल्याने त्यांनी रक्कम मागितली असता दिलेला धनादेश वटला नाही.
तिघांनी विश्वास संपादन करून नोकरी लावतो म्हणून ही फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमध्ये अजून कोणालाही अटक झाली नाही. कलम ४२०,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत