भरत गवारी,जव्हार
जव्हार शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक,फोटोग्राफर,पहिलेछायाचिञकार,पञकार, ज्योतिष अभ्यासक असे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व असलेले भालचंद्र शंकर वैद्य यांचे सोमवारी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. भालचंद्र वैद्य हे शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर पहिल्या फळीत काम केलेले ज्येष्ठ शिवसैनिक व फोटोग्राफर होते. हिंदुहृदय सम्राट ,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आंदोलनाची फोटोग्राफी त्यांनी केलेली आहे .तसेच आंदोलनाचे अनेक फोटो त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये, प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे त्यांची प्रेस फोटोग्राफर म्हणून पण ओळख होती. पुढे ग्रामीण भागात शिवसेनेचा प्रसार व्हावा, व शिवसेनेची पाळे मुळे घट्ट व्हावी या साठी प्रयत्न करण्याच्या सुचना शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिकांना दिल्या. हा आदेश मानून भालचंद्र वैद्य हे मुंबई वरुन जव्हार सारख्या ग्रामीण भागात स्थायिक झाले व त्यांनी फोटोग्राफी हा व्यवसाय स्वीकारला. संपूर्ण जव्हार तालुक्यात पहिला फोटो स्टुडिओ त्यांचा होता.
व्यवसाया बरोबर ते शिवसेनेचे काम देखील जोमाने करू लागले १९८० सालात ते जव्हार तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख झाले. त्यांनी जवळ- जवळ दहा वर्ष या पदावर काम केले. यावेळी त्यांना काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी यांचा प्रचंड विरोध पत्करावा लागला. अशाही परिस्थितीत त्यांनी न डगमगता शिवसेना ग्रामीण भागात वाढवली. नगरपालिकेत ते सन १९९७ ते २००२ सालात स्वीकृत नगरसेवक होते.
या पहिल्या फळीतील जेष्ठ शिवसैनिकाचे,पञकाराचे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा जव्हार शहरातून काढण्यात आली. जव्हारच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.