मुंबई / डहाणू. – सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी डहाणू (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला आहे. डहाणू तालुक्यातील अपूर्ण कामे पाच वर्षात पूर्ण करण्याची मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आमदार विनोद निकोले प्रयत्नशील आहेत. चालू अर्थसंकल्पात डहाणू व तलासरी तालुक्याला सुमारे 194 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातून आदिवासी आश्रम शाळा सुधारणे, नवीन प्रशासकीय इमारत व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना आमदार कॉम्रेड विनोद निकोले म्हणाले की, डहाणू व तलासरी तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार असून 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी डहाणू विधानसभा मतदारसंघातील विशेष रस्ते दुरुस्तीसाठी फक्त 76 लाख, प्रमुख जिल्हा मार्ग व राज्यमार्ग या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 07 कोटी 60 लाख रुपये, नवीन बाबींमध्ये आश्रम शाळा दुरुस्ती साठी 04 कोटी 11 लाख तसेच वसतिगृह व आश्रम शाळेसाठी 06 कोटी 59 लाख रुपये, मागील रस्ते व पुलांसाठी 164 कोटी 42 लाख रुपये, बजेट 5054 लेखा शीर्षक 06 कोटी 31 लाख, 04 कोटी 81 लाख रुपये इतका रुपयांचा निधी प्रथमच मंजूर झाला आहे. सन 2022 – 2023च्या अर्थसंकल्पात डहाणू व तलासरी तालुक्याला राज्य सरकारने सुमारे 194 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येत्या दोन वर्षात डहाणू तालुक्यातील सर्वच विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. डहाणू व तलासरी तालुक्याचा सर्वांगीण विकास, सर्वसामान्य जनतेची प्रगती आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून नवीन विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तसेच सन 2022 – 2023 च्या अर्थसंकल्पात डहाणू व तलासरी तालुक्याला झुकते माप मिळाले नसल्याने याबाबत आमचे पक्षश्रेष्ठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करतील. येत्या काळात डहाणू नगरपरिषद व तलासरी नगरपंचायतीसाठी नगरविकास विभागाचा, अल्पसंख्याक विकास विभागाचा, ग्रामविकास विभागाचा लेखाशीर्षक 2515 निधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती विकास योजने अंतर्गत निधी, आदिवासी विकास विभागाचा लेखाशीर्षक 3054 निधी, असे शासकीय विविध निधी 128 डहाणू (अ.ज) विधानसभा मतदार संघासाठी आणणार असल्याचे देखील भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगितले.