सध्या एकीकडे वातावरणात कमालीची उष्णता तर कुठे पावसाच्या हलक्या सरी असा बदल होत आहे. विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. हा परिणाम येणाऱ्या चक्रीवादळामुळे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बंगालच्या उपसागरात अग्नेय दिशेनं एक वादळ घोंगावत भारताच्या दिशेनं येत आहे. 2022 मधील हे पहिलंच वादळ आहे. या वादळामुळे पुन्हा हाहाकार उडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ह्या वादळाचं नाव काय आणि त्याचा परिणाम कसा होणार हे जाणून घेऊया.
या चक्रीवादळाला आसनी नाव देण्यात आलं आहे. आजपासून या चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार आहे. 22 मार्चपर्यंत हे चक्रीवादळ उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेनं पुढे सरकेल असा प्राथमिक अंदाज आहे. आसनी (Asani) हे नाव श्रीलंकेनं सुचवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 20 मार्चपर्यंत चक्रीवादळ अंदमान आणि निकोबार बेटाजवळून उत्तरेकडे पुढे सरकेल. या चक्रीवादळाचा परिणाम दक्षिण भारतात होणार आहे. केरळ, तमिळनाडू, पदुचेरी कर्नाटका राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा आहे. दुसरीकडे लडाख-जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
काही ठिकाणी कमालीचं तापमान वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे 5 दिवस आता महाराष्ट्रात कसं तापमान बदलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पुढच्या 48 तासांत विदर्भात उष्णता वाढणार आहे. तर दुसरीकडे कोकणात पावसात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.