मुंबई / डहाणू. (प्रतिनिधी) – डहाणू व तलासरी मधील जनतेला वाहन चालक परवाना देण्याच्या उद्देशाने आरटीओ शिबिर तलासरी मध्ये घ्यावे अशी लेखी व ई-मेल द्वारे मागणी माकप आमदार कॉ. विनोद निकोले यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या कडे केली आहे.
यावेळी आ. निकोले म्हणाले की, 128 डहाणू (अ. ज) विधानसभा मतदार संघात डहाणू व तलासरी हे 02 तालुके आहेत. त्याअर्थी डहाणू विभागात सरासरी 20000 ते 25000 वाहने आहेत. तसेच तलासरी विभागात सरासरी 8000 ते 9000 वाहने आहेत. डहाणू व तलासरी हा ग्रामिण आदिवासी पट्टा असून बरेचसे तलासरी तालुक्यातील व आजुबाजुला राहणारे आदिवासी तरुण आर्थिक अडचणीमुळे चारोटी विरार येथे जावून वाहन परवाना काढणे खर्चिक वाटते. तसेच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा याअर्थी बहुतांश मुले सिलवासा, वापी, दमण व गुजरात पट्यात कामाला जात असून बरेच वाहन परवाना नसल्याने अपघाती चालकास इन्शुरस मंजूर होण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात. त्याअनुषंगाने तलासरी मध्ये वाहन चालविणे परवाना वाटप शिबीर आयोजित करावे. त्याकरीता आपणास टेस्टींग करीता लागणारी जागा, मैदान, संगणक, इंटरनेट व्यवस्था व विद्युत व्यवस्था आम्ही आपणास उपलब्ध करून देऊ. गुजरात च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीता तलासरी दापचेरी येथे महाराष्ट्र चेक पोस्ट वर आरटीओ अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असतेच. डहाणू मलंग परिसरात मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयाजवळ आर. टी. ओ. संबंधी सर्व कामकाज सन 2017 च्या आधी होत होती. परंतु, ते आता बंद करण्यात आले आहे. परवानाधारक ऑटोरिक्षा ची वाहन योग्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यास विरार येथे जावे लागते. यात 35 कि.मी अंतराला मर्यादा असते. त्यापुढे काही झाल्यास मालक स्वतः जवाबदार असतो. त्यात अशावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जवाबदार कोण राहणार ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यात डहाणू व तलासरी ते विरार मधील अंतर सरासरी 95 कि.मी आहे. त्यात मुंबई – अहमदाबाद हायवे वर मोठ – मोठे वाहने असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने तलासरी तालुक्यात वाहन मोटार वाहन अनुज्ञप्ती वाटप शिबीर, नवीन वाहनांची पासिंग व परवानाधारक ऑटोरिक्षा ची वाहन योग्यता प्रमाणपत्र वाटप शिबीर (आर.टी.ओ संबंधी सर्व कामकाज) महिन्यातून किमान 04 वेळा आयोजित करावे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी जोरदार मागणी केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, अपर परिवहन आयुक्त (अति. कार्यभार) जितेंद्र पाटील, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र गायकवाड, वसई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांना देखील सदरहू निवेदनाची प्रत देण्यात आली आहे असे निकोले म्हणाले.