देशभरात कोरोना पुन्हा एकदा फोफावताना दिसतोय. दिल्लीमध्ये कोरोनाची लागण होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. अशातच आता केंद्र सरकार कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार बूस्टर डोससाठीचा कालावधी कमी करून तो 6 महिन्यांवर आणण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी बूस्टर डोस देण्यात येतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल इम्युनायजेशन टेक्निकल एडव्हायजरी ग्रुपची उद्या म्हणजे 29 एप्रिल रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत एडवायजरी ग्रुप लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांच्यातील अंतर कमी करण्याची शिफारस करू शकते.
यापूर्वी ICMR आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन इंस्टीट्यूशनने सुचवलं आहे की, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांनी अँटीबॉडीची पातळी कमी होते. अशा स्थितीत अशा वेळी बूस्टर डोस दिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
सध्या, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर 9 महिन्यांनी बूस्टर डोस घेण्याची परवानगी आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, देश-विदेशातील शास्त्रज्ञांच्या सूचना आणि अभ्यासाच्या निकालांच्या आधारे, कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील कालावधी 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. मात्र, NTAGI च्या सूचनेनुसार अंतिम निर्णय घेतला जाईल.
भारतात, 10 जानेवारी रोजी, आरोग्य सेवा, फ्रंटलाइन कामगार आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आजारी लोकांना बूस्टर डोसची परवानगी होती. एप्रिलमध्ये, सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना बूस्टर डोसची परवानगी दिली.