काँग्रेसचे अनेक नेते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील असा विश्वासही या आमदाराने व्यक्त केला आहे
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रण्टचे (एआययूडीएफ) आमदार करिम उद्दीन बरभुइया यांनी भाजपासंदर्भात मोठं विधान केलं आहे. देशातील सत्ताधारी पक्ष असणारा भाजपा पुढील पाच ते सहा वर्षांत संपून जाईल असं या आमदाराने म्हटलं आहे. बिहारमधील सत्तांतर ही याची सुरुवात असल्याचा दावा करताना यापुढे लोक आता भाजपाला स्वीकारणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे.
आसामच्या विधानसभेमध्ये सोनाई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बरभुइया यांनी काँग्रेसचे अनेक नेते एआययूडीएफमध्ये दाखल होतील असा दावा केला आहे. यामध्ये अगदी काँग्रेसचे बर्पेटाचे जिल्हाध्यक्ष, राज्याचे काँग्रेस सचिव यांचाही सहभाग असेल असं बरभुइया यांनी म्हटलं आहे. एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजलम यांनी २१ एप्रिल रोजी काँग्रेसचा उल्लेख बुडणारं जहाज असा केला आहे.