मुंबईत शिवाजीपार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होणार? यावरून राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेत दसरा मेळाव्यासाठी शंखनाद केला आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा आपलाच होणार आहे. यासाठी तातडीने कामाला लागा, अशा थेट सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या आहेत.
शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात आणि नेत्यांना महत्त्वाच्या सूचना करत आदेशही दिले. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.
शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांना दिले. उद्धव ठाकरे यांनी बैठकीत शिवसेनेतून फुटलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला. शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्यावा. फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल. असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरला. दसरा मेळाव्यासाठी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन कामाला लागा. विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुखसोबत असल्याने आत्मविश्वास दुणावल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यावर सत्ताधारी अपयशाचं खापर आमच्यावर फोडत आहेत. प्रकल्प राज्यात आणण्यासाठी खूप आम्ही महाविकास आघाडी सरकारने खूप प्रयत्न केले, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.