पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे ह्दयद्रावक घटना घडली आहे.याठिकाणी जन्मदात्या आईनेचं पोटच्या ३ वर्षीय मुलीचा अंत केला आहे. मागील दोन वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणाऱ्या निर्दयी आईने आपल्याच मुलीची हत्या केली. आर्थिक कणकण भासू लागल्याने महिलेनं आपल्या साना सुलेमानी या तीन वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
अफसाना उर्फ तारा सुलेमानी हिला जव्हार पोलिसांनी भादंवि कलम ३०२ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं आहे. जव्हार इथल्या साना सुलेमान या तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह तिच्याच घरा शेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तपासानंतर सानाची आई अफसाना उर्फ तारा सुलेमानी हिनेच तिचा खून केल्याचं समोर आलं. आपल्या पतीपासून विभक्त होऊन मागील दोन वर्षापासून तीन मुलांसह जव्हार येथे राहत होती. मात्र तिची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्या घरात नेहमीच पैशांवरून वाद होत होते. याच आर्थिक कणकणीला कंटाळून आरोपी आईने तीन वर्षीय चिमुकल्या सानाची हत्या केल्याचा अंदाज पालघर पोलिसांनी वर्तवला आहे .