पालघर , दि.31-: सार्वजनिक जीवनामध्ये लोकसेवकांनी प्रामाणिकपणे तसेच पारदर्शकपणे जनतेची कामे करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी सामूहिक रित्या शपथ घेतली.“जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन” अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जनतेला दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले . त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.
. सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी गोविंद बोडके,निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन आणि अँटी करप्शन ब्युरोचे उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास यांच्या उपस्थित शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरवर्षी 31 ऑक्टोंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते , या जयंती सप्ताहात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा यांबद्दलच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. यंदाच्या 2022 या वर्षी हा सप्ताह केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दिनांक 31 ऑक्टोबर 2022 ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या दक्षता जनजागृती सप्ताहाचे बोधवाक्य “भ्रष्टाचार मुक्त भारत – विकसित भारत ” असे आहे.