Palghar Nargrik

Breaking news

पालघर:: जिल्ह्यातील मुस्लिम तरुण तरुणींनी देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करावी- आसिफ बेग

–पालघर येथे तंझीमच्या मोफत कॉम्प्युटर क्लासच्या शुभारंभ

 

पालघर जिल्ह्यातील मुस्लिम तरुण तरुणींनी देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत परीक्षेत उत्कृष्टरित्या यशस्वी होऊन समाजात आपला योगदान दिले पाहिजे, जेणेकरून प्रशासनामध्ये मुस्लिम समाजातील लोक ही प्रशासकीय अधिकारी म्हणून चांगले पदावर काम करू शकतील. यासाठी जिल्ह्यात कार्ययरत मुस्लिम समाजसेवी संघटनेने विशेष पुढाकार घेतला पाहिजे. असे प्रतिपादन पालघर जिल्हा वाहतूक प्रभारी आसिफ बेग यांनी पालघर येथे ठाणे-पालघर जिल्हा ग्रामीण मुस्लिम उत्कर्ष संघटना(तंझीम)च्या मोफत कॉम्प्युटर क्लासच्या उद्घाटन प्रसंगी केले.

१८ डिसेंबर राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या निमित्ताने ठाणे-पालघर जिल्हा मुस्लिम उत्कर्ष संघटना(तंझीम) व मदरसा फैजुल इस्लाम ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आज जुना पालघर येथील मदरसा फैजुल इस्लाम येथे मुस्लिम समाजातील गरीब व गरजु मुलांसाठी मोफत कॉम्प्युटर क्लासचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पालघर जिल्हा वाहतूक प्रभारी आसिफ बेग यांनी तंझीमच्या पदाधिकाऱ्यांना म्हटले की आपण गरजू मुलांना मोफत कॉम्प्युटर क्लास सुरू केले, चांगले आहे परंतु मुस्लिम समाजातील तरुण तरुणींनी ही यूपीएससी व एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन उत्तीर्ण होण्यासाठी ही पुढाकार घेतला पाहिजे जेणे करून मुस्लिम समाजातुन ही मोठी संख्येत अधिकारी निर्माण होतील, व हेच पुढे जाऊन मुस्लिम समाजाला काळोख्यातून बाहेर काढण्याचे काम करतील. यावेळी त्यांनी उपस्थितांना रस्ते सुरक्षा संदर्भात व रस्ते वाहतूक नियमाबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केलं व लोकांनी रस्ते नियम कसे पाळावे, लहान मुलांना कमी वयात वाहन चालवण्याची परवानगी पालकांनी का देऊ नये, याचे धोके विशद केले. आपल्या भारतीयांमध्ये नियम पाळण्याबाबतची उदासीनता दूर व्हावी यासाठी ज्येष्ठांनी पुढाकार घ्यावा असे विनंती वजा सूचनाद्वारे स्पष्ट केले.

यादरम्यान तंझीमचे अध्यक्ष सगीर डांगे, उपाध्यक्ष इरफान भुरे व तंझीमच्या पालघर झोनचे अध्यक्ष फरीद लुलानिया यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. या मोफत कॉम्प्युटर क्लास साठी दहा कॉम्प्युटर सेट तंझीमचे उपाध्यक्ष इरफान भुरे यांच्याकडून विनामूल्य देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार मंडळी व तंझीमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Comment