पालघर- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद,पालघर यांचे वतीने जिल्हा क्रीडा संकूलाच्या प्रशस्त अश्या मैदानावर विभागीय बुद्धीबळ स्पर्धा व हॅण्ड बॉल स्पर्धांना दिनांक 22 डिसेंबर रोजी सुरूवात झाली.
बुद्धीबळ स्पर्धेत मुंबई विभागातील एकूण पाच जिल्हे व आठ महानगरपालिका अश्या एकूण 13 संघातील जवळपास 400 खेळाडू तर हॅण्ड बॉल स्पर्धेत 416 मुले व मुली असे एकूण 800 मुले व मुली सहभागी झाले होते.
स्पर्धेचे प्रमुख पाहुने म्हणून मा. सुनील शिंदे तहसिलदार पालघर हे उपस्थित होते. यावेळी मा. सुनील शिंदे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देवून या संकूलातुन भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू कसे घडविता येतील याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मा. सुहास व्हनमाने पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सांगितले की, जिल्हा क्रीडा संकूलनाच्या उभारणीसाठी जिल्हा प्रशासन, तालूका प्रशासन, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सहकार्यानेच जिल्हा क्रीडा संकूलाला एक आकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडीयम पालघर जिल्ह्यात अस्तित्वात येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
यावेळी पालघर जिल्ह्याचा हॅण्ड बॉलचा 17 वर्षाखालील मुलांचा संघ राज्यस्तरावर पात्र झाल्याबद्दल संघाचे कौतुकही उपस्थित मान्यवरांनी केले. जिल्हा स्वतंत्र निर्माण झाल्यापासून क्रीडा संघटना तसेच क्रीडा शिक्षक यांनी सुद्धा क्रिडा क्षेत्र जिल्ह्यात कसे वाढविता येईल याबद्दल करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी हॅण्डबॉल जिल्हा क्रीडा संघटनेचे जिल्हा सचिव राकेश ठाकरे व त्यांचे सहकारी पंच अधिकारी उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून प्राचार्य बोराडकर, पशुवैद्यकीय अधिकारी मुंबई, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, सचिव के.व्हि.नारायनण, दै.पुढारीचे पालघर विभागाचे संपादक मंगेश तावडे हे उपस्थित होते.