नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या राही ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, बसमधून प्रवासी बाहेर पडत होते. यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले.
अपघातानंतर खासगी बस समृद्धी महामार्गाच्या मध्यभागी पलटली झाली. अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर पडत होते. हे प्रवासी महामार्गाच्या बाजूला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले , एक प्रवासी जागीच ठार तर एक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
अपघातग्रस्त ठिकाणी पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त बस महामार्गाच्या बाजूला करण्याचं काम सुरु होते. काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
कार अपघातात शिक्षकाचा मृत्यू
दुसऱ्या एका अपघातात एकाचा मृत्यू झाला. राहता – शिर्डीनाजिक अवजड कंटेनर आणि कारच्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला. अहमदनगर मनमाड महामार्गावर शिर्डी नजीक झालेल्या अवजड कंटेनर आणि कारच्या अपघातात रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ प्राचार्य राजेंद्र बर्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात बर्डे यांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.