तलासरी. (प्रतिनिधी) – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या हलगर्जीपणामुळे सामान्य व्यक्तीपासून मोठ-मोठ्या उद्योजकांना आपला जीव गमावा लागला आहे याचा संताप व्यक्त करून प्रवाश्यांचे जीव वाचवण्यासाठी जेसीबी मध्ये बसून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे स्थानिक 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सिमेंटचे बेरीकेट हटवून मार्ग खुला करत आंदोलन यशस्वी केले आहे. दरम्यान बेरीकेट हटवा, माणसं वाचवा अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, मुंबई – अहमदाबाद हायवे वर महाराष्ट्र – गुजरात सीमेवर पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील दापचेरी तपासणी नाक्यावर बेकायदेशीर पण लावलेले सिमेंट बेरीकेट त्वरीत हटवा, दापचेरी तपासणी नाक्यावर होणारा आरटीओ चा भ्रष्टाचार त्वरीत बंद झालाच पाहिजे, आरटीओ पासिंग कार्यालय तलासरी स्थानिक विभागातच पाहिजे, स्थानिक वाहन चालकांना पास ची सुविधा मिळालीच पाहिजे, वाहतूक पोलीसांची मनमानी बंद झालीच पाहिजे, कामावरुन कमी केलेल्या कामगारांना त्वरीत कामावर हजर करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
उक्त रस्त्यावर लहान वाहने जाण्यासाठी कोणतीही सोया नव्हती त्याठिकाणी अनधिकृत रित्या वळणदार असे सिमेंटचे बेरीकेट लावण्याने 70 लोकांचे नाहक बळी गेले आहेत. याबाबत आरटीओ, पोलीस विभागाला तथा स्थानिक प्रशासनाला वारंवार सांगून देखील कोणतीही प्रकारची कार्यवाही होत नव्हती हे लक्षात घेत आमदार विनोद निकोले यांनी स्वतः जेसीबी मध्ये बसून सिमेंटचे बेरीकेट काढून टाकले आहेत. तसेच चेक पोस्ट च्या प्रशासनाबरोबर बैठक घेऊन स्थानिक नागरिक व प्रकल्पग्रस्तांना टोल वर नोकरीत घ्यावे व कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास भाग पाडले. त्याचबरोबर स्थानिक रिक्षा चालक, वाहनांचे चालक मालक यांना नाहक त्रास होणार याची खबरदारी आरटीओ व टोल प्रशासनाने घ्यावी असे सांगितले. शाळेकरी बस व रुग्णवाहिका यांना वाहतूक कोंडी तुन सुटका मिळावी म्हणून विशेष सोया राहावी अशी मागणी केली असता ती मान्य करण्यात आली.
याप्रसंगी आमदार विनोद निकोले, किसान सभा राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत गोरखाना, माकप जिल्हा सेक्रेटरी किरण गहला, तालुका सचिव लक्ष्मण डोंभरे, तलासरी उपसभापती नंदू हाडळ, तलासरी नगराध्यक्ष सुरेश भोये, सुरेश जाधव, धनेश अक्रे, विजय वाघात, चालक मालक संघटना रतन भोसले, यश कंपनी युनियन पदाधिकारी सतीश मुल्लासरी आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.