रोटरी डिस्ट्रिक्ट 3141, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे आणि रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण विज्ञान अभ्यासाद्वारे आत्मनिर्भर भारत या विषयावर म. नी. दांडेकर विद्यालय पालघर येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुक्यातील एकूण 18 शाळांनी सहभाग घेतला व पर्यावरण विज्ञान विषयक वेगवेगळे प्रकल्प, त्यांच्या प्रतिकृती, आकृती व माहितीसह सादर केले. यावर्षीपासून रोटरी क्लब तर्फे 18 शाळांमध्ये पर्यावरण हा एक ऐच्छिक विषय सुरू केला असून या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, प्रदूषण व विविध पर्यावरणीय समस्या यावर उपाय करू शकतील अशा कल्पना विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आल्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन रोटरीचे जिल्हा संचालक भूपेंद्र शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण विज्ञान विषयाच्या जिल्हा प्रमुख रितू बागला, उर्मिला प्रभू, राखी सुनील आणि अभय भाटिया हे उपस्थित होते.
प्रदर्शनात प्रथम क्रमांक राजगुरू ह.म. पंडित विद्यालय सफाळे, द्वितीय क्रमांक स.का.पाटील विद्यामंदिर माकूनसार तर तृतीय क्रमांक स्वर्गीय तारामती हरिचंद्र पाटील विद्यालय चहाडे यांनी पटकावला. बक्षीस वितरण समारंभास रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप अगरवाला, मालिनी अगरवाला, मुख्य समन्वयक राजेंद्र उन्नीकृष्णन, जिल्हा समन्वयक भगवान पाटील, पालघर क्लब अध्यक्ष प्रशांत पाटील, संदीप दांडेकर, भूषण सावे, संजय महाजन इत्यादी उपस्थित होते. सर्व विजेत्यांना तसेच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी नामदेव कवळे आणि विनय पाटील सर यांनी नियोजन बघितले.