Palghar Nargrik

Breaking news

पालघर ::- मद्यधुंद शिपायाकडून डॉक्टरच्या सल्ल्याशिवायच चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न; खळबळजनक प्रकार उघड…..

एकिकडे आरोग्य क्षेत्रात जगभरात प्रगतीचे टप्पे ओलांडले जात असताना काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहेत. अद्यापही बऱ्याच भागांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत. तर कुठे सुविधा आहेत, पण प्रशिक्षित आरोग्य अधिकाऱ्यांचा अभाव आहे. अशीच एक धक्कादायक घटना महाराष्ट्रातील पालघर येथे पाहायला मिळाली.

पालघरमध्ये आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरू असणारा खेळ नुकताच एका धक्कादायक घटनेतून समोर आला. तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी शिपायाकडून चिमुकलीवर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा मद्यपी शिपाई डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, रुग्णासोबत असलेल्या कुटुंबीयांनी त्याला रोखून धारेवर धरल्याने मोठा अनर्थ टळला.

मद्य प्राशन केल्याची कबुली शिपायाकडून देण्यात आली असून या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर राहत नसल्याची ओरड यापूर्वीही ऐकायला मिळाली होती. असं असूनही पालघर जिल्हा परिषद प्रशासन आणि सरकार यावर कठोर कारवाई करण्यात अजूनही अपयशी ठरत असल्याचंच वारंवार समोर येत आहे. दरम्यान या खळबळजनक प्रकरणानंतर रुग्णालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या मद्यपीवर कारवाई करण्याची मागणी उचलून धरण्यात आली आहे.

Leave a Comment