|मरणानंतरही नाही सुटका!कुडुस येथील स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर|
कुडुस. | प्रतिक मयेकर:
कंपन्यामुळे नावारुपास आलेली पालघर जिल्ह्यातील श्रीमंत समजली जाणाऱ्या कुडूस ग्रामपंचायतीला गावासाठी अद्यापही सुविधायुक्त स्मशानभूमी उपलब्ध करुन देता आले नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारावेळी मृताचे नातेवाइक आणि ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. दरम्यान स्मशानभूमीची जागा ग्रामपंचायतीची नसून ती खासगी असल्याचे सांगून ग्रामपंचायत स्मशानभूमिच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत असून वेळ मारून नेत असल्याचे चित्र आहे.
कुडुस ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सुविधांचा अभाव पाहता याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्यकार्य अधिकारी यांनीच लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीला मोठया प्रमाणात निधी मिळत असताना गावासाठी चांगल्या स्मशानभूमिसह इतर सुविधा का मिळू शकत नाही. असा सवाल उपस्थित केला जातोय. याप्रशनी ग्रामपंचायत केवळ पाहण्याची भूमिका घेतेय का, अशी चर्चा होत आहे. ग्रामपंचायत ची आर्थिक स्थिती ठीकठाक नसती तर एकवेळ समजले असते. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली असूनही ग्रामपंचायत याकडे का दुर्लक्ष केले जातेय हा संशोधनाचा विषय आहे.खासगी जमीन आणि शासकीय जमीन याचा वाद चालू आहे. त्यामुळे तेथे कोणतेही काम करताना येत नाही.