पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टेस्लाचे सीईओ आणि ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतली आहे. नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून आजपासून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. या भेटीनंतर एलॉन मस्क यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते असल्याचं म्हटलं. तसंच टेस्ला शक्य तितक्या लवकर भारतात दाखल होईल असं म्हटलं आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींसह फार चांगली भेट झाली. मला ते फार आवडतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी आमच्या फॅक्टरीला भेट दिली होता. आम्ही बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत आहोत,” असं मस्क म्हणाले. “भारताच्या भविष्याबद्दल मी प्रचंड उत्साही आहे. मला वाटतं जगातील इतर कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारताकडे फार काही देण्यासारखं आहे,” असं एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये एलॉन मस्क यांची भेट घेतली होती. कॅलिफोर्नियामधील टेस्ला मोटर्स फॅक्टरीला भेट देण्यासाठी नरेंद्र मोदी गेले होते.
यावेळी पत्रकारांनी एलॉन मस्क यांना टेस्ला भारतात कधी येणार? अशी विचारणा केली. यावर त्यांनी उत्तर दिलं की, “मला आत्मविश्वास आहे की, टेस्ला भारतात येईल. जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर करण्याचा हा प्रयत्न करु”.
“पंतप्रधान मोदींना खरंच भारताची काळजी आहे. कारण ते भारतात वारंवार एक लक्षणीय गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत, जे आम्हीही करु इच्छित आहोत. आम्हाला फक्त योग्य वेळ समजून घेण्याची गरज आहे,” असं एलॉन मस्क म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की “त्यांना भारतासाठी योग्य निर्णय घ्यायचे आहेत. त्यांना कंपन्यांना सहकार्य करण्याची इच्छा आहे. त्याचवेळी हे भारताच्या फायद्याचंही असेल हेही पाहत आहेत”.
The Wall Street Journal ने मुलाखतीत एलॉन मस्क यांना कंपनी भारतीय बाजारात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे का? अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी नक्कीच असं उत्तर दिलं. या वर्षाच्या अखेरपर्यंत टेस्ला भारतात फॅक्टरी कुठे उभी करायची ती जागा नक्की करतील असं त्यांनी स्पष्ट केलं.
मंगळवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध क्षेत्रातील सुमारे दोन डझनहून अधिक विचारवंतांची भेट घेत आहेत. यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, अभ्यासक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. मस्क यांच्याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी लेखक रॉबर्ट थर्मन आणि सांख्यिकीतज्ज्ञ निकोलस नसीम तालेब यांचीही भेट घेतली.