एमआयडीसी परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
बोईसर,०८ जुलै:- एमआयडीसी परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे बहुतांश ठिकाणच्या रस्त्याची गेली अनेक वर्षापासून दुरुस्ती होऊ न शकल्याने संपूर्ण रस्तेच खड्ड्यात गेले आहेत. त्या ठिकाणी सांडपाणी साचत असल्याने जागोजागी तळे तयार झाल्याचे दृश्य नजरेस पडत आहे. परिणामी मागील काही वर्षात अनेक कंपन्या बोईसर बाहेर स्थलांतरितही झाले आहेत. अशातच उर्वरित कंपन्यांच्या कामगारांनाही सुविधांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये रस्त्याची समस्या सर्वाधिक डोकेदुखीची ठरताना दिसून येत आहे. असेच भीषण दृश्य बोईसर एमआयडीसी परिसरात पाहायला मिळत आहे.
यामध्ये रस्ता अधिक खचला जाऊन त्यावरील खड्ड्याचा आकार दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याची भावना परिसरातून ये जा करणाऱ्याकडून व्यक्त होत आहे. अशातच काही कंपन्यांकडून त्यांचे सांडपाणी रस्त्यावरच सोडले जात आहे. तर काही ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या फुटल्या असून, त्यामधील दूषित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. हे सांडपाणी रस्त्यामध्ये साचून राहत असल्याने त्या ठिकाणी डासांची पैदास होत आहे. त्यामुळे परिसरातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.मालाच्या वाहतुकीमुळे एमआयडीसी परिसरात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यांचा भार पेलू शकतील,अशा दर्जाचे रस्ते एमआयडीसी परिसरात बनवले जाणे गरजेचे आहे.
पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यातच परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांना खड्डे पडून दुतर्फा रानटी रोपे देखील वाढली. त्यातच गटार सफाई न झाल्याने रस्त्यांवर गटारातील पाणी तुंबून राहत असल्याने स्वाभाविक अवजड वाहनांमुळे खड्ड्यांचा आकार देखील वाढला आहे.
जागोजागच्या दुरवस्थेमुळे रस्त्यांना जणू खड्ड्यांची माळ घातली की काय, असे वाटावे इतके विदारक दृश्य सध्या दिसत आहे.
एमआयडीसीमधील रस्त्यांवर रासायनिक कंपन्याचा माल घेऊन येणार्या अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. शिवाय खासगी आणि प्रवासी वाहने यांची देखील वर्दळ असते. देखभाल दुरुस्तीवर प्रतिवर्षी लाखो रुपये खर्च होतात. मात्र या पावसाळ्यात रस्त्यांवर वितभर खोलीचे खड्डे पडले आहेत. माल घेऊन येणारी वाहने कित्येक टन वजनाची असताना त्या क्षमतेचा रस्ता मात्र बनविलेला नाही. यामुळे रस्त्यावर आता खड्डेच खड्डे आहेत.
पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यास या धोक्यांचा अंदाज वाहनांना, पादचाऱ्यांना न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कडेला चिखल साचलेला आहे, तर खड्ड्यातील पाणी वाहनांमुळे आजूबाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे.रस्त्यावरून चालताना वाहन चालकांना त्याचबरोबर पादचाऱ्यांना खड्ड्यांच्या अडथळ्याची शर्यत पार करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.