यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ९ विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. गणपतीच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. या पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मध्य रेल्वे आणखी १८ (९DN+९UP) अनारक्षित फेऱ्या जाहीर केल्या आहेत. डाऊन मार्गावर ९ आणि अप मार्गावर ९ अशा या फेऱ्या असतील. यामध्ये ०११८५/८६ एलटीटी-कुडाळ विशेष गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सोडण्यात येईल. सोमवार, बुधवार, शनिवार असे तीन दिवस ही विशेष गाडी धावेल. या गाडीला एकूण २४ डब्बे असतील. मध्य रेल्वेच्या या विशेष फेऱ्यांमुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने गणपतीच्या काळात रेल्वेच्या २०८ , तर पश्चिम रेल्वेने ४० फेऱ्यांची घोषणा केली होती. त्यामुळे गणपतीच्या काळात कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यास मदत होईल.
पश्चिम रेल्वेच्या गणपतीसाठी ४० विशेष फेऱ्या
पश्चिम रेल्वेने कोकण मार्गावर गणपतीच्या काळात ४० विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मडगाव ते उधना या मार्गावर वसई पनवेल रोहा मार्गे आणि विश्वामित्री कुडाळ या विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी विशेष एक्स्प्रेसच्या ३० फेऱ्या धावणार आहेत. १४ ते १८ आणि २० ते ३० सप्टेंबर यादरम्यान ही गाडी मुंबई सेंट्रल येथून दर सोमवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी रात्री १२ वाजता सुटून पहाटे तीन वाजता सावंतवाडीत पोहोचले. परतीच्या प्रवासासाठी १५ ते १९ सप्टेंबर आणि २१ सप्टेंबर ते एक ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी पहाटे पाच वाजता ही गाडी सुटून मुंबई सेंट्रलला त्याच दिवशी रात्री ८.१० वाजता पोहोचेल. उधना ते मडगाव (सहा फेऱ्या) आणि विश्वामित्री ते कुडाळ (चार फेऱ्या) या गाड्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेने ४० गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या २४८ वर पोहोचली होती. यामध्ये आणखी १८ फेऱ्यांची भर पडल्याने हा विशेष रेल्वे फेऱ्यांचा आकडा २६६ इतका झाला आहे.
मुंबई-कुडाळ गणपती स्पेशल
01185 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवार, बुधवार आणि शनिवारी 13.09.2023 ते 02.10.2023 या कालावधीत 00.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
01186 स्पेशल कुडाळहून येथून मंगळवार, गुरुवार आणि रविवारी 13.09.2023 ते 02.10.2023 या कालावधीत 12.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 00.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, मंगोवन, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजपूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.
संरचना: 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 24 सामान्य द्वितीय श्रेणी.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.