राज्याच्या राजधानीचं शहर असलेल्या मुंबईमध्ये हवामान खात्याने जारी केलेल्या रेड अलर्टचा कालावधी शुक्रवारपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुंबईमध्ये बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांसहीत ठाणे जिल्ह्यातील शाळांना आज (27 जुलै 2023 रोजी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या रेड अलर्टची मुदत आज सायंकाळपर्यंत होती ती वाढवून शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे.
मुंबईला पावसाने झोडपले
भारतीय हवामान खात्याने मुंबईसहीत रत्नागिरी, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर आणि सातारा या जिल्ह्यांना गुरुवारी दुपारपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. यापैकी मुंबईच्या रेड अलर्टचा कालावधी 12 तासांहून अधिक काळाने वाढवण्यात आला असून आता मुंबईतील रेड अलर्ट शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत लागू असेल असं सांगण्यात आलं आहे. आज म्हणजेच गुरुवारी राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होईल असं हवामान खात्याने म्हटलं आहे. मुंबई शहर आणि उपनगराला बुधवारीही पावसाने चांगलेचं झोपडले. मुंबई उपमनगरामध्ये जुलैमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी साडेआठ ते रात्री साठेआठदरम्यान मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये साधारण 124 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. 1 ते 26 जुलैच्या रात्री साठेआठ वाजेपर्यंत 1557 मिलीमीटर पावसाची नोंद सांताक्रूझ केंद्रामध्ये झाली. यापूर्वी 2020 मध्ये 1502.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
तानसा ओव्हर फ्लो
शहापूर तालुक्यामधील तानसा धरण बुधवारी ओसंडून वाहू लागलं. धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणामधून 7 हजार 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या पार्श्वभीवर ठाणे जिल्हा प्रशासनाकडून धरण परिसरातील आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.