तीन हजार स्पर्धकांचा सहभाग
पालघर नगरपरिषदेमार्फत आयोजित नगराध्यक्ष वर्षा मॅरेथॉनमध्ये पालघरमधील तीन हजार स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रविवारी ही मॅरेथॉन नगरपरिषदेच्या शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीमार्फत घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी आपला सहभाग दर्शवला. विविध वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली.
मॅरेथॉन स्पर्धेत सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भर पावसात विविध स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी नगराध्यक्ष उज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत क्रीडा व शिक्षण समितीचे सभापती चंद्रशेखर वडे, गटनेता कैलास म्हात्रे, भावानंद संखे व नगरपरिषदेतील नगरसेवक नगरसेविका यांच्यासह उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हानमाने, जिल्हा वाहतूक शाखेचे नियंत्रक आसिफ बेग, तालुका क्रीडा अधिकारी भक्ती आंबरे, पालघर नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी, पत्रकार आदी यावेळी उपस्थित होते.
पालघर नगरपरिषदेतर्फे नगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन क्रीडा शिक्षण व सांस्कृतिक समितीमार्फत आयोजन केले होते. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील गटापासून ते ज्येष्ठ नागरिक गटापर्यंतच्या वयोगटात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा एक किलोमीटर पासून ते दहा किलोमीटर पर्यंत होती. या स्पर्धेला पालघरकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. विशेषतः तरुणींनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना पदक, मानचिन्ह व रोख रक्कम असे पारितोषिक नगर परिषदेच्या विविध मान्यवरांतर्फे वाटप केले गेले.
14 वर्षाखालील मुलांमध्ये सुशांत सांगळे यांनी प्रथम, अविनाश जाधव यांनी द्वितीय, तर श्रेयस मरले यांनी तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या याच वयोगटांमध्ये शार्वी मोरे हिने प्रथम, श्राव्या मोहिते हिने द्वितीय, तर चार्वी राऊत हिने तिसरा क्रमांक मिळवला.
17 वर्षाखालील गटामध्ये प्रतीक धनगरे याने प्रथम, अक्षय तुंबडा याने द्वितीय, तर हूमेल खान याने तिसरा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये वैदेही, कडू ज्योत्सना सुतार व दर्शना मस्कर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळवला.
19 वर्षाखालील मुलांच्या वयोगटांमध्ये ऋत्विक मस्कर याने प्रथम, राहुल डवला याने द्वितीय, तर संदेश मोर याने तिसरा क्रमांक मिळवला. तर मुलींमध्ये कृपा रसाळकर प्रथम, रुची चव्हाण दुसरी, खुशी प्रजापती तिसरी आली.
विधीज्ञ गटामध्ये हर्षदा थोरात यांनी पहिला, प्रियंका इंगळे यांनी दुसरा तर सारिका खानोलकर यांनी तिसरा क्रमांक मिळवला. याच गटामध्ये मोहन मोरे यांनी पहिला, भरत पाटील यांनी दुसरा तर अरुण जयकर यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.
ज्येष्ठ नागरिक यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन पालघर मधील विलास ठाकूर यांनी प्रथम, विठ्ठल संखे यांनी द्वितीय तर शांतीलाल परदेशी यांनी तिसरा क्रमांक या गटांमध्ये पटकावला आहे.
पुरुषांच्या खुला गटामध्ये शैलेश गांगोडा यांनी पहिला, सचिन गोविंद यांनी दुसरा, तर अभिषेक पागधरे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. महिला खुल्या गटामध्ये जयश्री पुंजारा यांनी पहिला, सोमय्या राव यांनी दुसरा, तर सोनाली गल्लूगडे यांनी तिसरा क्रमांक पटकावला.