पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्याच्या स्थापनेला आता नऊ वर्ष पूर्ण झाली असून पोलीस कल्याण निधीच्या बळकटीकरणासाठी पालघर पोलिसांनी प्रथमच भव्य स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणारा हा निधी पाच कोटी रुपयांच्या जवळपास मिळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याला जिल्ह्याच्या नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवुन कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच औद्योगिक सुव्यवस्था व सुरक्षा आणि सागरी सुरक्षा राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पालघर जिल्ह्यातील १७०० पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधारवड असलेला पोलीस कल्याण निधी वृध्दींगत करण्यासाठी पालघर पोलीसांकडून पोलीस कल्याण निधी संकलन कार्यक्रमाअंतर्गत आयोजीत “सागर तराणा” या कार्यक्रमाचे आयोजन १ डिसेंबर रोजी सायंकाळी कोळगाव (पालघर) येथील सिडको मैदानावर करण्यात आले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय मदतीसाठी, अचानक उद्भवणाऱ्या अडचणी प्रसंगी सहाय्यता मिळावी, पोलीस पाल्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी, मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसह पोलिसांच्या कुटुंबीयांच्या संदर्भात वेगवेगळ्या उपक्रमांच्या आयोजनासाठी या निधीचा वापर केला जात असतो.
पोलीस कल्याणासाठी असणारा निधी १० लाख रुपयांच्या जवळपास शिल्लक असल्याने पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या निधीच्या बळकटी करण्यासाठी विशेष लक्ष घातले आहे. पालघर जिल्ह्याच्या स्थापनेनंतर या निधीच्या बळकटी करण्यासाठी आजवर इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच उपक्रम राबविण्यात येत असून पोलिसांच्या मदतीसाठी होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व थरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमाला हास्य जत्रा कार्यक्रमातील अनेक कलावंत सहभागी होणार असून अहोरात्र नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या पोलिसांसाठी या कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालघर पोलिसांनी केले आहे.
अहोरात्र गस्त देणाऱ्या पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी भरघोस निधी उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. पोलीस कल्याण निधी अंतर्गत इतर नियमित उपक्रमांसोबत पोलिसांसाठी अनुदानित खानपान सेवा व मंगल कार्यालय उभारण्याचा मानस आहे. या उपक्रमाला जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद लाभत आहे.
— बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर