— प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष….
–एकीकडे मोटार सायकल चालकांन वर हेल्मेट सक्तीची कारवाई, दुसरीकडे वाहतुक विभागाच्या समोर अवैध विद्यार्थ्यांची वाहतुक…
–जिल्ह्यात बहुतांश शाळेत परिवहन समिती कार्यान्वित नाही, समित्या फक्त कागदावरच….
— वाहतुक विभागाच्या देखत रिक्षा चालक, बस, व्हॅन विद्यार्थ्यांना अक्षरश
–कोंबून विद्यार्थ्यांची वाहतुक
पालघर
जिल्ह्यातील रिक्षातून होणाऱ्या अमर्याद प्रवासी वाहतुकीला आळा बसावा, यासाठी मुजोर रिक्षाचालकांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांकडून नेहमी कारवाई होत आहे.तर, दुसरीकडे देशाचे उद्याचे भविष्य म्हणून ज्या शालेय मुलांकडे पाहिले जाते, त्यांच्या जिवाशी खेळण्याचा मुजोरपणा रिक्षाचालकांनी चालविला आहे. याकडेही प्रादेशिक परिवहन विभागाने सोईस्कर काणाडोळा करत आहे.अनेक वाहनचालक विद्यार्थी वाहनातून प्रवास करताना मोबाइलवर बोलतात. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे पालघर नागरिक टीमच्या पाहणीत दिसून आले.
पालघर शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी शहर पोलिस दलाचे वाहतुक पोलीस कार्यरत आहे. त्यानुसार ठिकठिकाणी चेकिंग पॉइंट ठरवून देण्यात आले आहे. मात्र, याच पोलीसांच्या समोरून शहरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून वाहतुक केली जात आहे. यामध्ये रिक्षा आणि खाजगी इको, मॅजिक यांच्या वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, आरटीओ विभाग सोडाच वाहतुक पोलीस आणि स्वतः पालक दुर्लक्ष करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक पालक आजही व्यस्त असल्याने मुलं शाळेत सुरक्षित जातात की नाही ? त्यांना शाळेत सोडणारी वाहने कोणती आहे ? याबाबत कुठलीही विचारपूस करीत नसल्याची बाब समोर येत आहे.शाळांच्या परिवहन समित्याही कागदावरच असल्याचे यामधून दिसून येत आहे. आरटीओ विभागाकडून तपासणी केल्याचा दावा केला जातो. मात्र त्यांच्या शालेय विद्यार्थ्यांची नियमबाह्य कोंबून होणारी वाहतुक दिसत नाही. एकूणच जिल्ह्यात असे दोन चित्र दिसत असल्याने सगळं काही रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे.स्कूल बस, रिक्षांसह लहान कारमधून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. रिक्षा, व्हॅन, लहान कारमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची ने-आण केली जाते. मुख्य म्हणजे, अशी वाहतूक करणाऱ्यांकडून अनेकदा सुरक्षितते विषयक खबरदारी घेतली जात नाही.
पालकांकडून दुर्लक्ष शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे पालकांचेही दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. आपल्या मुलाची वाहतूक करणारे वाहन नेमके कशावर चालते? त्यात आपला मुलगा किंवा मुलगी सुरक्षित आहे की नाही? जादा विद्यार्थी कोंबल्यामुळे त्याला काही त्रास होतो का? हे जाणून घेण्याची तसदी कोणीही घेत नाही. पालक तक्रार करीत नाहीत म्हणून वाहन चालक दक्षता घेत नसल्याचे चित्र आहे.
विध्यार्थी वाहतूक करणाऱ्या बहुतेक खाजगी वाहणांची इन्शुरन्स संपलेली असून फिटनेस सुद्धा संपलेला आहे. या साठी लागणार खर्च करण्यापेक्षा वाहतूक विभागच्या कर्मचाऱ्यांना चिरी मिरी देऊन काम सुरु आहे.