Palghar Nargrik

Breaking news

सोलापूरचं मिलेट सेंटर बारामतीला, भाजप आमदार देशमुखांचा राजीनाम्यावरून युटर्न, दादा म्हणतात, ते खरं मानायचं नसतं…!

सोलापूर|जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं भरड धान्य संशोधन केंद्र बारामतीकडे वळविलं आहे. सोलापुरात सर्व स्तरातुन याचा विरोध सुरू आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरसाठी मंजूर झालेलं ‘मिलेट सेंटर’ सोलापूरला झाले नाही तर आमदारकीचा राजीनामा देऊ असे सांगितले होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी ४ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर आले असता, माध्यमांनी मिलेट सेंटरचा मुद्दा समोर आणून सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याच्या घोषणेची आठवण करून दिली. त्यावर बोलताना ‘राजीनामा देतो असे ठरलेले शब्द असतात, ते खरे समजायचे नसतात’, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक मराठा आमदारांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु कुणी राजीनामा दिला नाही, असं म्हणून आपल्या विधानाला त्यांनी उदाहरणाची देखील जोड दिली.

राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सोमवारी सोलापुरातील सिटी पार्क हॉटेलमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एक सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अनेक बाबींवर भाष्य केले. यावेळी २०२२-२०२३ मध्ये सोलापूरसाठी श्री अन्न उत्कृष्टता तृणधान्य प्रशिक्षण केंद्र मंजूर केले होते. ही घोषणा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली होती. हे प्रशिक्षण केंद्र बारामतीला जाणार असल्याचे परिपत्रक जाहीर झाले आहे. त्यावर सोलापुरातील सर्वच राजकीय नेते अजित पवारांचा विरोध करत आहेत.

सुभाष देशमुख यांनी सोलापूरसाठी मंजूर झालेलं मिलेट सेंटर सोलापूरला झाले नाही तर आमदारकीचा राजीनामा देऊ असे सांगितले होते. याच राजीनाम्याची आठवण पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना करून दिली. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले. राजकारणात राजीनामा देतो, हे ठरलेले शब्द असतात. प्रत्यक्षात राजीनामा कुणी देत नाही. ती बोलायची पद्धत असते. राजीनामा देतो, हे शब्द राजकारणात खरे समजायचे नसतात, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले.

नाचता येईना अंगण वाकडे, चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर हल्लाबोल

भाजपने तीन राज्यात मोठा विजय प्राप्त केला आहे. तेलंगाणामध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसचा ज्या राज्यात पराजय होतो त्या ठिकाणी ईव्हीएमवर आरोप केला जातो. काँग्रेसची अवस्था म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे. आगामी काळात लोकसभेचा निकाल देखील तोंडात बोटे घालणारा असेल. तेलंगाणा राज्यात बीआरएसची अवस्था खराब झाली आहे. वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून बीआरएसमध्ये जे गेले आहेत, त्यांना पुन्हा भाजप मध्ये घेऊ, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.