Palghar Nargrik

Breaking news

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण…

बोईसरमध्ये वनविभागाच्या जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभी करण्याचा सपाटा सुरू आहे. या अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने तोडक कारवाई करून सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच जागेवर भूमाफीयांकडून अतिक्रमण सुरू आहे. बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर पुन्हा अतिक्रमण करण्याचा डाव आखला जात आहे.

ही सरकारी जागा बळकावण्यासाठी भूमाफीयांना बोईसर ग्रामपंचायतीमधील विद्यमान पदाधिकारी यांचा वरदहस्त असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे सरकारी जागेवर अवैध कब्जा करीत अनधिकृत इमारती,चाळी आणि गाळे फोफावत असताना ग्रामपंचायत महसूल आणि वन विभागाच्या सुस्त कारभारामुळे सरकारी जागा भूमाफियांच्या घशात सहज जात आहेत. बोईसर मंडळ अधिकारी आणि तलाठी सजा बोईसर यांच्या डोळ्यादेखत काटकर पाडा, गणेश नगर, राणीशिगाव रोड, दांडीपाडा, लोखंडी पाडा या परिसरात सरकारी आणि राखीव वन जमिनीवर अनधिकृत बांधकामे प्रचंड वाढल्याने परिसराला बकाल रूप आले आहे