शिवसेना कोणाची याचा फैसला पुढच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना (Shivsena) कोणाची यावर 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. 15 डिसेंबरला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं होतं. मात्र, तेव्हा 2 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर ठाकरे तसंच शिंदे गटाकडून पक्ष तसंच चिन्हावर दावा करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष तसंच धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) दिलं होतं. मात्र याविरोधात ठाकरे गटाने (Thackeray Group) सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यावर आता 2 फेब्रुवारीला सुनावणी पार पडेल. या सुनावणीत ठाकरे गटाकडून काय युक्तिवाद केला जातो? आणि शिंदे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आमदार अपात्र सुनावणी
शिवसेना आमदार अपात्रता निकाल 10 जानेवारीच्या आत म्हणजेच पुढच्या दोन दिवसात लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता निकाल तयार केल्याचंही सूत्रांनी म्हटलंय. निकाल तयार आहे मात्र नार्वेकर सध्या नवी दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांशी चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. राहुल नार्वेकर यांनी कालच यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे आमदार अपात्रता निकाल 10 जानेवारीच्या आत लागण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना कोणाची, कोणाचा व्हीप बरोबर या सर्व प्रकरणांमध्ये निकाल येण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांचं बंड
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून उठाव केला. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. या जोरावार एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आम्हाला पक्षातील सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा असून आमचीच शिवसेना खरी आहे, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. तसंच पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि नावावर देखील शिंदे गटानं दावा केला. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. निवडणूक आयोगानं अंतिम निर्णय होईपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.
अंधेर पोटनिवडणूकीत पर्यायी चिन्ह
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षावर दावा ठोकण्याची चढाओढ सुरू असतानाच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाली. निवडणूक आयोगाने त्यानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवलं. त्यामुळे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि तलवार-ढाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं. तर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं.