घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी आता कोस्टल रोड (Coastal Road) लवकरच सुरू होणार आहे. कोस्टल रोड टोल मुक्त असणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर आता या मार्गाबद्दल मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल चहल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘एबीपी माझा’सोबत संवाद साधताना त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की, कोस्टल रोड हा 10 फेब्रुवारीनंतर मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. 31 जानेवारी रोजी मुंबई महापालिकेकडे कोस्टल रोडचा ताबा येईल. त्यानंतर 10 दिवस या कोस्टल रोडवर ट्रायल रन होणार आहे. त्यानंतर मुंबईकरांच्या सेवेत कोस्टल रोड आणण्यात येणार असल्याची माहिती चहल यांनी दिली.
कोणतेही कर्ज नाही, मग कोस्टल रोड तयार केला कसा?
चहल यांनी सांगितले की, कोस्टल रोड करता कोणतेही कर्ज घेतलेले नाही. त्यामुळे कुठलीही परतफेड नाही. म्हणूनच कोस्टल रोडवर कोणताही टोल लागणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. कोस्टल रोडचा प्रकल्प इन्फ्रा सेस फंड मधून उभारण्यात आला आहे. कोस्टल रोडवर मुंबईची लाईफलाइन असलेली बेस्ट बसही धावणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोस्टल रोडच्या वरळी ते मंत्रालय या पहिल्या टप्प्यातील 4 मार्गिका दिवसाच्या वेळी 12 तासांसाठी खुल्या करण्यात येतील. तर, रात्रीच्या वेळी उर्वरित 12 तासामध्ये मार्गीकांचे दुस-या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात येईल. कोस्टल रोडचे संपूर्ण काम 15 मे पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
खवळलेल्या समुद्री लाटांपासून कोस्टल रोड आणि मुंबईला वाचवता येईल?
कोस्टल रोड आणि पर्यायानं मुंबईचं संरक्षण करणारी समुद्र भिंत श्रीलंका आणि फ्रान्स या देशांतील कामांचा अभ्यास करुन बनवली गेली आहे. समुद्र भिंत बांधतांना नैसर्गिक खडक समुद्रातील जैवविवीधतेला पुरक असे निवडले गेले आहेत. समुद्र लाटांचा प्रभाव कमी करणारे तंत्र समुद्र भिंत बांधतांना वापरले गेले. राष्ट्रीय समुद्र विद्यान संस्था या समुद्राचा अभ्यास करणारी यंत्रणेकडून कोस्टल रोडच्या कामामुळे समुद्रावर होणारा परिणाम, समुद्राचे तापमान, लाटांचा पॅटर्न, गढुळपणा यांचा अभ्यास करणारी यंत्रणा मुंबईच्या समुद्रात कार्यरत केली गेली. दर सहा महिन्यांनी सरकारकडे या यंत्रणेकडून अहवाल दिला जातोय. त्यामुळे समुद्रातील आगामी धोक्यांची सूचना यंत्रणेला मिळू शकते .
>> कसा आहे मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?
– मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल. दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा आहे.
– प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे.
– एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे
– यामध्ये 15.66 किमी चे तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल
– कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल.