Palghar Nargrik

Breaking news

स. तु. कदम शाळेच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिकाची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप.

विशेष प्रतिनिधी,पालघर.

पालघर मधील जीवन विकास शिक्षण संस्था संचलित स. तु. कदम शाळेचे संचालक वागेश सदानंद कदम व प्रणव वागेश कदम यांच्या विरोधात पालघर पोलीस स्टेशन येथे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी गुन्हा रजि. नंबर ३२/२०२४ अन्वये भादविस कलम ४०६, ४२०, ४६८, ४७१ व ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

शिक्षण क्षेत्रामध्ये नाव झाल्यानंतर वागेश कदम व प्रणव कदम यांनी बांधकाम क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. पालघर मधील बांधकाम क्षेत्रात गणपत राऊत उर्फ गटम आप्पा हे अत्यंत नावाजलेले बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध होते. वागेश कदम व प्रणव कदम यांनी साल २०१५ मध्ये गटम आप्पा यांचा मुलगा धीरज गणपत राऊत यांच्यासह सतु रिअल्टी या बांधकाम क्षेत्रातील भागीदारी संस्थेची स्थापना केली होती.

सतु रिअल्टी या संस्थेच्या माध्यमातून सतु ऑरा नावाचा एकूण आठ इमारती व सुमारे ३२० रहिवासी सदनिका असलेला प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले. या प्रकल्पातील दोन इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास गेल्यानंतर त्यातील एकूण ८० सदनिकांपैकी ५८ सदनिकांची विक्री करण्यात आलेली होती.

अशी झाली फसवणूक

एकूण विक्री झालेल्या सदनिकांपैकी पाच सदनिकांची विक्री करताना वागेश कदम व प्रणव कदम यांनी आपसात संगनमत करून त्यांना कोणतेही अधिकार नसताना व दस्त नोंदणीसाठी धीरज राऊत यांच्या संमतीची व स्वाक्षरीची आवश्यकता असताना देखील बेकायदेशीरपणे विक्री कराराचे मौल्यवान दस्तऐवज तयार केले आणि भागीदारी पत्रानुसार सदरचे दस्तऐवज अधिकृत नसताना ते अधिकृत आहेत असे दाखवून सुमारे एक कोटी सत्तावन लाख रुपयांची रक्कम भागीदारी संस्थेच्या नावाने उचलून गैरव्यवहार केला. हि रक्कम वागेश सदानंद कदम व प्रणव वागेश कदम यांनी परस्पर स्वतःच्या खात्यात वळती करून स्वतःच्या फायद्याकरिता वापरली.

सदरची बाब लक्षात आल्यावर धीरज राऊत यांनी तात्काळ पालघर पोलीस स्टेशन आणि त्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार दिली होती. मात्र राजकीय दबावाखाली पालघर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यास नकार दिल्याने अखेर राऊत यांनी पालघरच्या जुडीशियल मॅजिस्ट्रेट कोर्टात फौजदारी दावा दाखल केला होता.

पालघर पोलीस दलाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पालघर पोलिसांनी फसवणुकीची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे नाईलाजाने धीरज राऊत यांच्यावर कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली. वागेश कदम व प्रणव कदम यांचे ठाणे जिल्ह्यातील एका वजनदार राजकीय नेत्याबरोबर घनिष्ठ संबंध असल्याचे जगजाहीर होते. या राजकीय ओळखीचा वापर करून कदम पिता पुत्रांनी दबावतंत्राचा अवलंब केला. याच दबावतंत्रापुढे झुकून पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यामुळे अखेर तक्रारदार धीरज राऊत यांना कोर्टाचा दरवाजा ठोठावणे भाग पडले.

या प्रकरणी पालघर पोलीस दल त्यांचे कर्तव्य बजावण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे निरीक्षण माननीय कोर्टाने आपल्या आदेशात नोंदवलेले असून यामुळे राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या पालघर पोलीस दलाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली असल्याचे दिसून आले आहे.