Palghar Nargrik

Breaking news

लोकसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातील ४८ आदिवासी संघटना एकवटल्या

आदिवासींवरील अन्याय थांबत नसल्याने ; लोकसभेसाठी उमेदवार देण्याची तयारी

पालघर | जावेद लुलानिया

आपल्या समाजाचे आधी सरकारने तुकडे  केलेत त्यांनतर  राजकीय पक्षांनी तुकडे केले आहेत. संपूर्ण आदिवासी  समाज एक राहिला तर आपण सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. त्यासाठी आदिवासी समाजासाठी  झोकून देणारे आमदार खासदार निवडून पाठवले पाहिजेत. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातील 48 संघटनांचा  एक प्रतिनिधी उमेदवार म्हणून उभा करण्याची तयारी केली पाहिजे असे विचार काका धोदडे यांनी वेती येथे बुधवारी पार पडलेल्या संयुक्त आदिवासी हक्क व संरक्षण समितीच्या सभेत घेतले. सभेस उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिल्यामुळे पालघर लोकसभा निवडणुकीचे चित्र रंगतदार पाहायला मिळणार आहे.

पालघर आदिवासी जिल्हा होऊनही १७ संवर्गातील पदांची भरती झालेली नाही, तलाठी, वन विभाग, डी एड/ बी.एड पात्र अपात्र शिक्षकांना भरती करू शकले नाहीत. धानिवरी, पारसी डेअरी, येथील घटनांमध्ये आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही.पालघर जिल्हा झाल्यानंतरही बिंदू नामावलीत सुधारणा झाली नाही. पालघर जिल्ह्यात आदिवासी महिला तसेच आदिवासी आश्रमशाळा मध्ये आदिवासी मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबलेल्या  नाहीत.

आदिवासी आश्रम शाळांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या भोजन ठेक्यात ठेकेदाराची लूट, भ्रष्टाचार थांबलेला नाही. आदिवासी जागा मालकावर अत्याचाराच्या घटना  थांबलेल्या  नाहीत. या सारखे असंख्य आदिवासी प्रश्न आदिवासी लोकप्रतिनिधी सोडवू शकले नाहीत. आदिवासी नेत्यांना पक्षांची बंधने येतात. त्यामुळे राजकीय पक्षांना बाजूला ठेवून आपण पालघर जिल्ह्यातील ४८  आदिवासी संघटनांचा एक उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवू असा निर्णय यावेळी घेण्यात आला. पालघर, वसई, वाडा,जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, विक्रमगड येथील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उमेदवार म्हणून मोहन गुहे, भास्कर दळवी यांनी आपली इच्छा व्यक्त केली. येत्या  काही दिवसात संघटना आपला  उमेदवार देऊ असे मत आदिवासी हक्क व संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष माधव लीलका यांनी मांडले. यावेळी डॉ सुनिल प-हाड,  भास्कर दळवी, राहुल धूम, वसंत भसरा, अशोक भोईर, ऍड. विराज गडग, मिनाताई धोदडे, प्रकाश पाटकर, प्रसाद पर्हाड, श्यामसुंदर चौधरी, परशुराम चावरा, तांबडी, मोहन गुहे, अशोक  शिंगडा,  विलास वांगड, निलेश कासट, माधव तल्हा यासह अनेक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.