Palghar Nargrik

Breaking news

पालघर जिल्ह्याचा विकास हा माझा श्वास आणि ध्यास,खा.राजेंद्र गावित

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामाचा आढावा आणि पुढील कामाचे चित्र काय असेल याबाबत खा. गावित यांनी एका मुलाखतीत माहिती दिली. ते म्हणाले, की पालघर लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारात ६२ टक्के मतदार हे नागरी भागात राहतात, तर ३८ टक्के मतदार हे ग्रामीण भागात राहतात. नागरी, सागरी आणि डोंगरी भागाच्या विकासात सुसूत्रता आणून विकासाचे नियोजन केले आहे.

वसई स्टेशनचा मॉडेल स्टेशन म्हणून विकास करणार

वसई विरार महानगरपालिका ही मोठी क्षेत्र हे मोठे क्षेत्र असून त्याचा नियोजनबद्ध विकास करण्यावर भर आहे. वसई स्टेशन हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा चर्चगेट सारखे विकसित करण्यात येणार असून या स्टेशनला जंक्शनचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केला होता. राम नाईक ही जसे मच्छीमारांचे मित्र होते, तसे मीही मच्छीमारांचा मित्र असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अर्नाळा किल्ल्यावर समुद्राखालून पाणी देणार

स्वातंत्र्योत्तर काळात कधीही अर्नाळा किल्ला परिसरात पाण्याची व्यवस्था झाली नव्हती; परंतु ही व्यवस्था आम्ही करतो आहोत. अर्नाळा किल्ल्यावर समुद्राखालून पाण्याच्या वाहिन्या टाकून पिण्याचे पाणी पुरवले जाणार आहे. विरार ते डहाणू असा सागरी मार्ग विकसित केला जात असून यापुढे विरारवरून डहाणूला एक तासात येता येईल, हे माझे स्वप्न नसून ते प्रत्यक्षात येणारे काम आहे, असा दावा खा. गावित यांनी केला.

 

इगतपुरी-उमरोळी लोहमार्ग मंजूर

पालघर जिल्ह्यातील अनेक मोठ्या प्रादेशिक योजना तसेच गाव पातळीवरच्या पाणी योजना राबविण्यात आल्या. पालघर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून साडेआठशे कोटी रुपये मिळवण्यात आले. इगतपुरी ते उमरोळी हा लोहमार्ग आणि इगतपुरी ते पालघर चौपदरी मार्ग हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ते प्रस्ताव मंजूर झाले आहेत. हे दोन्ही प्रकल्प जंगलातून जात असल्यामुळे वनखात्याच्या मान्यतेसाठी ते प्रलंबित आहेत. त्यांच्या मान्यतेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

नायगावजवळ पाच किलोमीटरचा उड्डाणपूल

पालघर जिल्ह्यात ,कुपोषण हा अजूनही गंभीर प्रश्न. आहे या प्रश्नावर मात करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर मुंबई प्रादेशिक विकास प्राधिकरणाची हद्द थेट डहाणूपर्यंत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते आहे. नायगाव भाईंदरजवळ पाच किलोमीटरचा उड्डाणपूल तसेच पालघरजवळ दोन किलोमीटरचा उड्डाणपूल प्रस्तावित असून हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागले तर लोकांच्या रहदारीचा प्रश्न निकाली निघेल.

दीडशे गावे रस्त्याने आणि विजेने जोडणार

पालघर जिल्ह्यात सुमारे दीडशे गावे, पाडे असे आहेत की जिथे अजूनही संपर्क होत नाही. या गावांना वीज आणि रस्ते नाहीत. ही सर्व गावे, पाडे आगामी पाच वर्षात रस्त्याने आणि विजेने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्यात नक्की यश येईल यात कुठलीही शंका नाही. पालघर जिल्ह्यातील आगामी काही प्रकल्पांसाठी भूसंपादन करावे लागणार नाही अशा पद्धतीने नियोजन केले जात आहे.

पालघरचा विकास हा माझा श्वास

माझ्यावर कोणी कितीही टीका केली आणि मी कुठला आहे हे सांगितले जात असले, तरी त्याकडे फारसे लक्ष न देता जन्मभूमी कोणती आहे, यापेक्षा माझी कर्मभूमी कोणती आहे याला मी जास्त प्राधान्य देतो आणि पालघर जिल्ह्याचा विकास हा माझा श्वास आणि ध्यास आहे, या भावनेतून मी काम करीत आहे, असे खा. गावित यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे.