Palghar Nargrik

Breaking news

Pune Crime : शरद पवारांच्या नातीच्या शोरुममध्ये चोरी, लाखोंचा माल लंपास, अखेर तिघांच्या मुसक्या आवळल्या

पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खून, खंडणी, दहशत माजवणे, चोऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. आता तर चोरट्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नातीच्या शोरुमवरच डल्ला मारला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझाइनर निवेदिता साबू यांच्या कल्याणी नगरमधील शोरूमचे लॉक तोडून रोख रक्कमेसह लाखोंच्या ऐवजावार चोरट्यांनी हात साफ केला होता. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने या चोरट्यांना रांजणगाव येथून अटक केली आहे.

निवेदिता साबू या शरद पवार यांच्या नात, तर अजित पवार यांच्या सख्ख्या भाची आहेत. त्यांचं कल्याणी नगर भागात कपड्यांचं शोरूम आहे. त्यांच्या या शोरूममधून चोरट्यांनी ७ ऑगस्ट रोजी ९ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होती. त्यानंतर पोलिसांनी रांजणगाव येथून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

विवेक उर्फ गुरुदेव मनिराम राजपुत (वय ३०, सध्या रा. रांजणगाव, मुळ रा. मैनपुर, उत्तर प्रदेश), अभिषेकसिंग उर्फ प्रदिप पप्पुसिंग (वय २५, कानपुर, उत्तर प्रदेश), अमितसिंग विजयसिंग (वय ३१, बांधा, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सर्व आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्त ते रांजणगाव येथे राहण्यास आहेत. पेंटिंग तसेच सेंट्रिंगचे कामे ते करतात. कल्याणी नगर येथे ते फिरायला आले होते. त्यावेळी शोरूममध्ये रात्री उशिरा लाईट सुरू असल्याचे त्यांनी पहिले आणि त्याच वेळी त्यांनी चोरीचा डाव रचून रोकड आणि मुद्देमालावर आपला हात साफ केला.


ही घटना लक्षात आल्यानंतर एरोडा पोलीस ठाण्यात यासंबंधीची फिर्याद नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि आरोपी हे रांजणगावमधील संकल्प सिटी, मानवी अपार्टमेंटच्या पार्किगमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयदीप पाटील, वैभव मगदुम, स्वप्नील पाटील, अंमलदार हरिष मोरे, प्रविण भालचिम, विशाल इथापे, मनोज सांगळे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली. 

Leave a Comment