Palghar Nargrik

Breaking news

रतन टाटा यांना जगभरातून श्रद्धांजली; कधी सुरू होणार उद्योगसूर्याची अंत्ययात्रा?

ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योग जगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणाऱ्या उद्योजक रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. टाटांच्या निधनाचं वृत्त समोर येताच संपूर्ण देशातून आणि जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. भारतीय उद्योग जगतासह विविध क्षेत्रांमध्येही आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या रतन टाटा यांना सारा देश सलाम करत त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे.

मुंबई पोलिसांचे बँड पथक रतन टाटा यांना सलामी देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. त्याशिवाय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही त्यांच्या अंतिम दर्शनासाठी कुलाबा येथील निवासस्थानी दाखल झाला आहे.

रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी एनसीपीए आणि नजीकच्या भागात तयारी सुरु करण्यात आली असून, इथं वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मरिन ड्राईव्ह इथं असणाऱ्या ओबेरॉय हॉटेलपाशी असणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा आणि टाटा कुटुंबीयांशी संवाद साधत श्रद्धांजली दिली, टाटा कुटुंबाला आधार दिला. अधिकृत माहितीनुसार केंद्र शासनाच्या वतीनं केंद्रीय गृह मंत्री अमित शाह रतन टाटा यांच्या अंत्यविधीसमयी उपस्थित राहतील.

रतन टाटा यांच्यावर वरळीतील पारसी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. इथं दुपारी 4 वाजल्यानंतर त्यांचं पार्थिव आणलं जाईल. ज्यानंतर इथं असणाऱ्या प्रार्थना सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि यानंतर विद्युतदाहिनीच्या माध्यमातून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात आज गुरुवारी एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधीची घोषणा केली.

“रतन टाटा यांना श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील, तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.”

अधिकृत माहितीनुसार रतन टाटा यांचं पार्थिव मुंबईतील मरिन लाईन्स इथं असणाऱ्या NCPA Lawns इथं ठेवण्यात येणार असून, सकाळी 10.30 ते 4 वाजेपर्यंत सामान्यांना त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे. यानंतर रतन टाटा यांच्या पार्थिवाचा शेवटचा प्रवास सुरू होणार असून, वरळीतील डॉ. ई मोजेस रोड इथं असणाऱ्या स्माशानभूमीत ते दाखल होईल.

Leave a Comment