भाजप शिवसेना आजी माजी अध्यक्षात रस्सी खेच….?
संपादक-जावेद लुलानिया
पालघरमधील विक्रमगड विधानसभेच्या जागेसाठी महायुतीने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे एक पाऊल पुढे असून, आपला विक्रमगड चा गड राखण्यात ते यशस्वी होतात का ते पाहणे गरजेचे आहे.
महायुती मध्ये जागा वाटपाचे गणिते अजुनही जुळलेले नाही. त्यामुळे उमेदवार देखील निश्चित झालेले नाहीत. पालघरमधील विक्रमगड विधानसभेच्या जागेसाठी महायुतीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार सुनील भुसारा यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, महायुतीच्या तिनही पक्षाच्या संभाव्य उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी बूथ निहाय बैठका घेणे सुरू केले आहे. त्यामुळे विक्रमगड विधानसभेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
२२ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार आहे. संभाव्य उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे आयाराम, गयाराम तसेच पक्ष बदलाच्या कोलांट्याउड्या सुरू झाल्यात. पक्ष नेतृत्व याकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्ष २२ नोव्हेंबरपर्यंत जागा वाटप आणि उमेदवार निश्चित करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, पालघरमधील विक्रमगड विधानसभेचे चित्र वेगळे दिसत आहे. इथं बंडखोर न होता आपल्याच पक्षाला जागा मिळावी म्हणून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
वर्चस्व असलेली जागा कायम ठेवणार असल्याने, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा आपल्यालाच मिळावी, असा आग्रह येथील पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. त्यादृष्टीने मतदार संघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने संभाव्य उमेदवार कमळाकर धुम यांनी विभागवार बैठका घेणे देखील सुरू केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ही जागा आपल्याला मिळावी म्हणून पक्ष नेतृत्वाकडे रेटून मागणी केली आहे.
मतदार संघात शिवसेना पक्षाचे वर्चस्व असल्याचे मोखाडा, जव्हार, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील कंचाड जिल्हा परिषद गटात लोकप्रतिनिधी आणि शाखांचे जाळे तळागाळापर्यंत पोचल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवसेनेकडून जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैठका घेत आहेत.
भाजपची धुसफूस सुरू
दरम्यान, भाजपने कोणताही गाजावाजा न करता, या मतदार संघावर सन 2009 आणि 2014 मध्ये आपलेच वर्चस्व असल्याचे, श्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले. लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून प्रचंड मताधिक्य मिळाल्याने, भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल अधिकच वाढले आहे. ही जागा आपल्याला निश्चित मिळणार हा आत्मविश्वास ठेऊन, येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बूथ निहाय बैठका घेऊन वातावरण तापवले आहे. भाजपकडून जेष्ठ नेते हरिश्चंद्र भोये आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुरेखा थेतले यांची नावे चर्चेत आहेत. महायुतीतील तिनही पक्षांनी विक्रमगडच्या जागेसाठी दावे केल्याने, धुसफूस सुरु आहे.
मविआ’चं एक पाऊल पुढं
याउलट स्थिती महाविकास आघाडीत आहे. आघाडीकडून शरद पवारांचे निकटवर्तीय आणि खंदे समर्थक विद्यमान आमदार सुनील भुसारा यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांनी मतदार संघातील चारही तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन, आतापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एक पाऊल पुढे टाकले आहे.