पालघर | प्रतीक मयेकर – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटा येथे ब्रिजखालील परिसर हा दिवसेंदिवस जलतलावात रूपांतरित होत असून, याच मार्गावर अवघ्या काही मीटरवर सरकारी रुग्णालय आहे. परिणामी रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांपासून ते रुग्णवाहिकांपर्यंत प्रत्येक जण अक्षरशः दलदलीतून वाट काढत आहे.यामुळे शासन व स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि निठळ्या व्यवस्थापनाचा पर्दाफाश झाला आहे.
- आरोग्याच्या दारात रोगाचा सापळा!
या पाण्यात साचलेली घाण, गाळ, कचरा, डासांचे साम्राज्य – हे सर्व रोगांचे माहेरघर बनले आहे. तोंडावर पावसाळा असताना जर प्रशासनाने आत्ताच उपाययोजना केली नाही, तर येथे डेंग्यू, मलेरिया, पाण्यातून पसरणारे आजार मोठ्या प्रमाणावर फैलावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.रुग्णालयासमोर असं चित्र हे आरोग्य व्यवस्थेवरचं मोठं कलंक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जमा झालेले पाणी, घाण आणि दलदल – आरोग्याच्या नावाने शाप!”रुग्णालयात जाण्यापूर्वी दलदलीशी झुंज!”
रुग्णालयात उपचारासाठी येणारे वृद्ध, महिला, लहान मुलं, अपंग व्यक्तींना साचलेल्या पाण्यातून वाट काढताना अक्षरशः जीव गमावण्याची वेळ येते. अनेकदा रुग्णवाहिका देखील वेळेत पोहोचू शकत नाहीत.शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी अशी अवस्था असेल तर जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेची व्याख्या बदलावी लागेल!
जनतेचा आक्रोश – “कधी उघडणार तुमच्या डोळ्यांची झापडं?”
“आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती केली, फोटो दिले, तक्रारी केल्या… पण काही उपयोग नाही.”
“आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. रुग्ण दारात मरणार आणि प्रशासन कागदपत्रांत गुंतलेलं दिसणार.”
“हे फक्त जनतेसाठी महामार्ग आहे, प्रशासनासाठी नाही!”अशा संतप्त प्रतिक्रिया आता नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.