पालघर ( प्रतिनिधी ) –
पहलगाम हल्लाचे प्रत्युत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाने केलेली कामगिरी देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरली. या अद्वितीय शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठीच आजची तिरंगा रॅली आहे, असे प्रतिपादन 131 बोईसर (अ. ज.) विधानसभा आमदार विलास तरे यांनी केले. सोमवारी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, जय भवानी, जय शिवाजी, जय जवान, जय किसान असा जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराज चौक (चार रस्ता) येथील हुतात्मा चौक येथून पाचबत्ती पर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई, बौद्ध बांधवांसोबतच हजारो नागरिक तिरंगा ध्वज घेवून सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक (चार रस्ता) येथून तिरंगा रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी आमदार विलास तरे, आ. राजेंद्र गावित, जिल्हा प्रमुख कुंदन संखे, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. वीर जवानांना सॅलूट करण्यासाठी तथा सैनिकांच्या सन्मानासाठीच ही तिरंगा रॅली आहे. भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना पालघर येथील शाळेतील शेकडो एन.सी.सीचे विद्यार्थी सैन्यात भरती होण्यास तयार होते, असे वक्त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, माजी आमदार अमित घोडा, केदार काळे, ज्योती मेहेर, दिवाकर सिंह, उत्तम घरत, भारती कांबळी, वैदही वाढाण, संजय बिहारी, यांच्या सह शिवसेनेचे नेते, उप नेते यांच्यासह विद्यार्थी, युवक, युवती, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक संस्था, विविध सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्ष, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीमुळे रॅलीत विविधतेत एकतेचे दर्शन घडले. देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांना नमन करण्यासाठीच ही तिरंगा रॅली आहे, असे आमदार तरे म्हणाले. या रॅलीमुळे पालघर जिल्ह्यात देशभक्तीचे वातावरण तयार झाले. पालघर जिल्ह्यातील सर्वच संघटना या रॅलीत सहभागी झाल्याने रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते.
दरम्यान सन 2002 मध्ये आलेल्या “माँ तुझे सलाम” या चित्रपटातील अभिनेता सनी देओल यांचा ‘दूध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो चीर देंगे’ हा डायलॉग उच्चारताच टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.