प्रतिक मयेकर
बोईसर, ३ जून– “रस्ता म्हणजे विकास” ही घोषणा आता विनोद वाटावा इतक्या थराला पोहोचली आहे. डहाणू तालुक्यात ठेकेदार जय बारी याने उभारलेला रस्ता म्हणजे जनतेच्या पैशांचा आणि संयमाचा सडलेला खेळ आहे. वरून पाहता सिमेंटचा रस्ता वाटतो, पण पाय ठेवला की उमजतं – हे बांधकाम नाही, हे शुद्ध फसवणूक आहे.
नाही फलक, नाही जबाबदारी!
या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा माहिती फलक लावण्यात आलेला नाही. कोणता निधी? कोणती योजना? किती खर्च? याची कोणतीही पारदर्शक माहिती नागरिकांना दिलेली नाही. हे काम कोणाच्या मर्जीतून व कोणाच्या आशीर्वादाने पार पडले, हे स्पष्ट होते.
२% ‘कमिशन’चा गंध!
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शाखा अभियंते ठेकेदारांकडून २% टक्केवारीने कमिशन घेतात. हे प्रकरण केवळ बांधकाम निकृष्टतेपुरते मर्यादित नाही तर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे प्रतीक ठरत आहे. या मागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही संमती असल्याचा संशय बळावतोय.
जणतेच्या तक्रारींचा वाऱ्यावर उडवाजाव!
अनेक वेळा संबंधित शाखा अभियंता काळे यांना यासंदर्भात तक्रार करण्यात आली. मात्र, त्यांनी ठरवून दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, डहाणूचे वरिष्ठ अभियंता अजय जाधव यांनाही याची कल्पना देण्यात आली होती, तरीदेखील त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
जनता दरबारात गाजणार प्रश्न!
या प्रकरणाचा पाठपुरावा करताना संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध पुढील जनता दरबारात अधिकृत तक्रार करण्यात येणार आहे. नागरिकांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली असून, सरकारी निधीचा असा उघडपणे अपव्यय व भ्रष्टाचार जनतेला सहन होणार नाही, हे स्पष्ट आहे.