प्रतिक मयेकर
तारापूर औद्योगिक वसाहतीत (MIDC) सध्या सुरू असलेल्या २ एमएलडी क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या कामात गंभीर अनियमितता आढळून आली आहे. या टाकीला लागून असलेली संरक्षण भिंत ठेकेदार “आदित्य इंटरप्रायजेस” कडून भर पावसातच उभी केली जात आहे. या कामाचे चित्र हे स्पष्ट दाखवत आहे की, पावसाळ्यात होत असलेले बांधकाम हे शासकीय निधीचा दुरुपयोग आणि दर्जाहीन काम याचे जिवंत उदाहरण आहे.
भिंतीचे बांधकाम पावसात? – दीर्घकालीन टिकावावर प्रश्नचिन्ह!
भर पावसात सिमेंट व काँक्रीटचे काम केल्यास त्याचा मजबुतीवर मोठा परिणाम होतो, हे सामान्य तज्ज्ञांनाही ठाऊक आहे. अशा हवामानात बांधकाम केल्यास भिंत काही महिन्यांतच भेगाळते, गळते किंवा पडते. परंतु, याकडे ठेकेदार आणि अधिकारी दोघांनीही दुर्लक्ष केल्याचे दिसते.
MIDC उपअभियंत्यांचे दुर्लक्ष का?
या कामावर MIDC चे उपअभियंता यांची थेट जबाबदारी असूनही त्यांनी या प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. असा प्रश्न उपस्थित होतो की,पावसात बांधकाम करण्यास परवानगी कुणी दिली?यामध्ये अधिकाऱ्यांची संमती होती का?
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर
या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना ना योग्य साईट सेफ्टी आहे, ना पावसापासून बचावासाठी कोणतीही सोय. जलस्रोताशी संबंधित बांधकाम असल्याने सुरक्षेचे निकष काटेकोर असणे गरजेचे होते. परंतु येथे देखील “जलद पूर्णतेच्या नावाखाली सुरक्षेला तिलांजली” दिल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकारी आणि MIDC मुख्यालयाचे याकडे लक्ष जाईल का?
या प्रकरणात ठेकेदाराच्या कामावर चौकशी होणे गरजेचे आहे. तारापूर MIDC मधील अनेक प्रकल्पांमध्ये अशीच दर्जाहीन, ढिसाळ आणि वेळेआधी केलेली पूर्णता दाखवणारी कामे पूर्वीही समोर आली आहेत. त्यामुळे हा एकच प्रकल्प नव्हे तर संपूर्ण यंत्रणाच दायित्वशून्यतेच्या गर्तेत आहे, असेच म्हणावे लागेल.