Palghar Nargrik

दरवाज्यातून लटकून प्रवास करणारे विद्यार्थी; TVM शाळेची सुरक्षा झोपलेली, CKM ट्रॅव्हल्सची गाडी RTO च्या नजरेतून सुटलीच कशी?…

प्रतिक मयेकर 

बोईसर: TVM शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवाज्यातून लटकून प्रवास करतानाचा धक्कादायक फोटो समोर आला असून, हा प्रकार फक्त निष्काळजीपणाच नव्हे तर थेट विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करण्यासारखा आहे. बोईसर परिसरातील CKM ट्रॅव्हल्सची शाळेची बस विद्यार्थ्यांनी अक्षरशः दरवाज्याबाहेर अर्धवट झुकून प्रवास करताना आढळून आली आहे. ही घटना सध्या पालक वर्गात संतापाचे कारण बनली आहे.दरवाजा उघडा… विद्यार्थी लटकले… अपघाताला आमंत्रण? शाळा बसचा दरवाजा उघडा ठेवणे, त्यातून विद्यार्थी लटकून प्रवास करणे, हे वाहतूक नियमांचे सरळसरळ उल्लंघन आहे. बसमध्ये जागा नसल्यामुळे विद्यार्थी दरवाज्यात उभे राहत असतील, तर ही ‘ओव्हरलोडिंग’ची स्पष्ट लक्षणं आहेत. हे चित्र किती भीतीदायक आहे याची कल्पनाही अपघात झाल्यावरच येईल का?

CKM ट्रॅव्हल्सचा बेजबाबदारपणा की गाडी मालकाची हरकती?

या प्रकरणात केवळ ट्रॅव्हल्स कंपनी नाही तर गाडी मालकाची जबाबदारीसुद्धा तेवढीच आहे. वाहतुकीचे नियम, विद्यार्थी वाहतूक नियम, गाडीतील दरवाजा बंद ठेवण्याचे बंधन, सुरक्षारक्षक असणे – हे सर्व नियम फक्त कागदावर आहेत का? गाडी चालक आणि वाहक यांचं अपात्र वर्तन हे विद्यार्थी सुरक्षेचा खेळखंडोबा करत असल्याचं प्रत्यक्ष चित्रात दिसत आहे.

RTO विभाग फक्त दंडसत्रासाठी फिरतो का?

पालघर जिल्ह्यात RTO अधिकाऱ्यांचे नियमित वाहन तपासणी मोहिमांचे फोटो आणि पोस्टर वारंवार व्हायरल होतात. मग ही शाळा बस त्यांच्या नजरेतून कशी सुटली? शाळेच्या वेळेत, बिझी मार्गावरून धावत असलेली ही वाहतूक नियम तोडणारी गाडी त्यांना का दिसली नाही? की RTO विभाग फक्त रिक्षा चालक व व्यवसायिक गाड्यांवर दंड टाकण्यासाठीच कार्यरत असतो? ही ढिसाळ यंत्रणा केवळ फोटो काढण्यासाठी रोडवर आहे की विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यासाठी?

शाळेचे मौन आश्चर्यजनक, प्रशासन गप्प का?

या प्रकरणावर TVM शाळेने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शाळेची प्रथम जबाबदारी आहे, आणि तीच जबाबदारी शाळा झटकतेय हे दुर्दैव आहे. वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे दोघेही फोन न उचलणं हे त्यांच्या उदासीनतेचं द्योतक आहे. अशा घटनांवर वेळेत कारवाई न झाल्यास, ही निष्काळजीपणा कधीही प्राणघातक ठरू शकतो.

Leave a Comment