तारापूर, बोईसर – पर्यावरण रक्षणाच्या गोंधळात केवळ घोषणाच होत असताना, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील G- 21 या जीन्स उत्पादन करणाऱ्या कंपनीने नैसर्गिक पर्यावरणाशी प्रचंड घातक खेळ सुरु केला आहे. गवताच्या आडून केमिकलयुक्त पाणी सोडण्याचा धक्कादायक प्रकार केला असतानाच, या घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर कंपनीतील कामगारांनी “नजर” ठेवण्याचा थेट प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
कामगार पत्र्यावर चढून घेत होते व्हिडिओ..
नागरिकांनी पाहणी करण्यासाठी कंपनीजवळील परिसरात गेले असता, त्यांना कंपनीच्या पत्र्यावर चढलेले काही कामगार मोबाईलने त्यांचा व्हिडिओ शूट करत असल्याचे आढळले. ही घटना घडताना ना त्या कामगारांनी आपली ओळख दिली, ना त्यांनी कोणतीही परवानगी घेतली.

मग प्रश्न असा निर्माण होतो — काय लपवायचं आहे या कंपनीला?
सद्यस्थितीत त्या ठिकाणी शेती नसून, एक निवासी सोसायटी आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे — जर कंपनीचे पाणी सुरक्षित आणि नियमबद्धरीत्या सोडले जात असेल, तर नागरिकांचे निरीक्षण करताना छुपे चित्रीकरण का? हे सूचित करते की केवळ प्रदूषणच नव्हे, तर बेकायदेशीर प्रकार लपवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे.